| पनवेल | प्रतिनिधी |
वाहनाला काळ्या काचा लावल्यास त्या वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीबाबतची माहिती इतरांना होत नाही. यातून काही अनुचित प्रकार घडू शकतात. त्यामुळे काळ्या काचा लावून फिरणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच चारचाकी वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म लावल्यास वाहनधारकाला दंड करण्याची तरतूद मोटार वाहन कायद्यात आहे. मात्र, पोलिसांकडून अशा वाहनधारकांविरोधात पाहिजे त्या प्रमाणात आजही कारवाई करण्याबाबत चालढकलपणा केला जात असल्याने आजमितीस शहराच्या विविध भागात काळ्या काचा लावून मिरविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पनवेल, उरण, नवी मुंबई आदी ठिकाणी चार चाकी वाहनांना काळ्या काचा लावणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागलेले दिसून येत आहे.
पनवेल व उरण, नवी मुंबई परिसरात अनेक वाहनांवर काळ्या काचा लावलेली वाहने रस्त्यांवरून धावतांना दिसतात. यात पत्रकार आणि पोलीस देखील मागे नाहीत. त्यांच्या गाड्यांना देखील काळ्या काचा लावलेल्या दिसतात. आलिशान कार आणि त्याला काळ्या काचा लावून फिरण्याचा मोह वाहनचालकांना आवरत नाही. काळ्या काचांच्या वापरावर बंदी असूनही पनवेल परिसरात त्यांचा सर्रास वापर केला जात आहे. दरम्यान, परिवहन विभागाच्या परवानगीने तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना आपल्या वाहनांवर काळ्या काचा लावण्याची मुभा आहे.
अनेकदा समाजकंटकांकडून गैरकृत्य, गुन्हे करण्यासाठी काळ्या काचांचा गैरवापर होण्याचा धोका असल्याने काळ्या काचा वापरण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र, ही बंदी नावापुरतीच असल्याचे एकंदरीत परिस्थितीवर अधोरेखित होतांना दिसते. वाहनांना काळ्या फिल्म लावल्यास कारवाईची तरतूद असली तरी याविषयी फार गांभीर्याने कारवाई होत नसल्याने काळ्या फिल्म लावून चारचाकी वाहने शहरातील रस्त्यांवरून धावतांना दिसतात. दरम्यान, वाहनाला काळ्या काचा लावून फिरल्यास सुरुवातीला 500 रूपयांचा दंड आकारला जातो. मात्र, त्याच वाहनधारकाने दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास 1500 रूपयांचा दंड आकारला जातो. दरम्यान, अधिकृत पत्रकार किंवा माध्यम प्रतिनिधी यांना आपल्या वाहनांवर ‘प्रेस’ असा शब्द लिहून फिरू शकतात. मात्र, पत्रकारिता क्षेत्रातील कसलीही जाण नसतांना दुचाकी व चारचाकी वाहनांवर सर्रासपणे ‘प्रेस’ असा शब्द लिहून मिरविण्याचे प्रकारही पनवेल परिसरात होतांना दिसतात. सदरचा प्रकार करणाऱ्या व्यक्तींचे वाहन हे कोणत्याही प्रसारमाध्यमाशी नोंदणी केलेले नसते, परंतु अनेकदा लोकांना फसवण्यासाठी किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी तसेच पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी अशा व्यक्तींकडून आपल्या वाहनांवर ‘प्रेस’ लिहून मिरवण्याचे प्रकार पनवेल परिसरात होतांना दिसत असल्याने अशा व्यक्तींवर पोलीस, वाहतूक पोलीस व आरटीओ यंत्रणांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.




