। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
महानगरपालिकेत अर्ज करून गॅरेज समोरील शेड तोडेल आणि गॅरेज बंद पाडेन असे बोलून लोखंडी रॉडने मारहाण केल्या प्रकरणी तिघांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालीद खान राहणार फेस 1, तळोजा हे त्यांचा मोठा भाऊ आणि काम करणारा मुलगा यांच्यासह तळोजा, सेक्टर 2 येथील जारा ऑटो पार्ट्स या गॅरेजवर होते. यावेळी शादाब बेग व त्याचे मित्र सोहेल आणि नदीम अन्सारी यांनी तेथे येऊन धमकी दिली. आणि मोटरसायकलचे काम फ्री मध्ये करून देण्यास आणि प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये हप्ता म्हणून देण्यात सांगितले. हप्ता दिला नाही तर महानगरपालिकेत अर्ज करून गॅरेज समोरील शेड तोडेल आणि हातपाय तोडून येथून हिसकावून लावेल अशी धमकी दिली. त्याला नकार दिला असता शादाब बेग, सोहेल आणि नदीम अंसारी यांनी शिवीगाळ करून खालिद याला लोखंडी रॉडने मारहाण केली.







