कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
| मुंबई | प्रतिनिधी |
द्राक्ष पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेची व्याप्ती व निकष बदल करणार, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मंत्रालयात द्राक्ष बागायतदार संघटनांच्या अडचणी, फळ-पीक विमा योजना, अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष पिकांच्या नुकसानीसाठी द्यावयाच्या नुकसान भरपाई संदर्भात आयोजित बैठकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीस आमदार रोहित पाटील, आमदार अभिजित पाटील, उपसचिव संतोष कराड, संचालक रफिक नाईकवडी, संचालक वैभव तांबे, अवर सचिव राजेश पाध्ये व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, हवामानाच्या बदलामुळे द्राक्ष शेतकरी अडचणीत आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी द्राक्ष बागायतदार शेतीचेही यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. या तक्रारी लक्षात घेता पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेची व्याप्ती व निकष वाढविण्याबाबत योग्य ती कार्यवाही विभागाने करावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, कृषी विभागाने या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक दृष्टीकोन ठेवला असून द्राक्ष उत्पादकांच्या अडचणींना प्राधान्याने हाताळले जाईल. तसेच त्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत समन्वय साधून ठोस निर्णय घेण्यात येतील, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.







