। चिपळूण । प्रतिनिधी ।
नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू होताच प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागात उभारलेले राजकीय फलक हटवण्यास सुरवात झाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.
नगरपालिका निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आठ दिवसांपूर्वीच फलक जप्तीची मोहीम राबवली. यात मुदतबाह्य व अनधिकृत फलक हटवण्यात आले; मात्र त्यानंतरही काही परवानाधारक असलेले फलक शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आले होते. त्यामध्ये काही राजकीय फलक होते. त्यावर मंगळवारी आचारसंहिता लागू होताच कारवाई करण्यात आली. 12 कर्मचाऱ्यांनी 2 वाहनांच्या मदतीने शहरातील बहादूर शेखनाका, मार्कंडी, पाग पॉवरहाऊस, चिंचनाका, बाजारपेठ, बाजारपूल, गोवळकोट, उक्ताड, भेंडीनाका आणि महामार्गावरील राजकीय व अन्य फलकही तातडीने हटवण्यात आले. या मोहिमेसाठी पालिकेने स्वतंत्र पथक तयार केले असून, आगामी काळात हे पथक कार्यरत राहणार आहे. त्यामुळे राजकीय स्वरूपाचे फलक व अनधिकृत उभारल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.







