| कोलाड | प्रतिनिधी |
सातवा महिना उजाडला तरी परतीचा पाऊस बंद होण्याचे नाव घेत नसल्याने उभी असणारी भात पिके आडवी झाली असून, पिकांना मोड आले आहेत. त्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, बळीराजा पूर्णपणे संकटात सापडला आहे. या भिजलेल्या भातामुळे पेंढाही वाया जाणार असल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
हवामानाच्या दिलेल्या अंदाजानुसार येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडणार आहे. त्यामुळे भात कापणीला विलंब होत असून, उभी असणारी भात पिके आडवी पडून कुजून जात आहेत. त्यामुळे सोन्यासारखे आलेले पिक मातीमोल झाले असून, शेतकरी वर्गाच्या डोळ्यात पाणी आले आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील सातवा महिना उजाडला तरी पाऊस सुरु असल्यामुळे शेतकरी वर्ग पाऊस बंद होण्याची वाट पाहत आहेत. परंतु, अजुनही 80 टक्के भात कापणी बाकी आहे. ही भात पिके पूर्णपणे आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.







