| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरती जीवना बंदर या ठिकाणी नवीन जेट्टी विकसित करण्यात येत आहे. या जेट्टीच्या कामासाठी खूप मोठ्या प्रमाणावर दगडांचा भराव करण्यात आल्याने समुद्राच्या पाण्याने आपला प्रवाह बदलला आहे. त्यामुळे जीवनाबंदर जुनी जेट्टी व खालचा जीवना हा परिसर पूर्णपणे वाळूने भरून गेला आहे. तसेच, फेस्टिवल बीच, शासकीय विश्रामगृह तसेच दांडे स्मशानभूमी या परिसरातील किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर मोठ्याप्रमाणात लाटा आदळत आहेत. गेल्य एक महिन्यापासून ओहोटीला देखील पाणी मागे हटत नव्हते. परिणामी श्रीवर्धन समुद्रकिनारी कोणत्याही प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स पाणी मागे जात नसल्याने उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पौर्णिमा असल्यामुळे समुद्राला मोठी भरती व ओहोटी येते. सायंकाळच्या वेळेस ओहोटी असल्याने समुद्राचे पाणी काही अंशी मागे गेलेले पाहायला मिळाले. परंतु, मागील आठवड्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे व अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाण्याची पातळी अजिबात कमी होत नव्हती. यासाठी दांडे परिसरातील खाडीचे तोंड खोल करण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून भरतीच्या वेळी पाणी खाडीमध्ये जाईल व त्याचा किनारपट्टीवरील मारा कमी होईल.





