| महाड | प्रतिनिधी |
वरंध घाटात बुधवारी (दि.5) एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या वरंध भोर घाटात एका मोटरसायकल स्वार चालकाचा 100 फूट वरून कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. शिवाजी डेरे हा तरुण मुंबई वरून भोर तालुक्यातील शिळींब या मूळ गावी जात असताना घाटातील साईट पट्टीचा अंदाज न आल्याने गाडी 100 फुट खोल खाली कोसळली. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी महाड एमआयडीसीचे पोलीस दाखल झाले असून, या घटनेची सखोल चौकशी करीत आहेत. स्थानिकांच्या मते, या ठिकाणी संरक्षण भिंत नसल्यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत. पीडब्ल्यूडी आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे आणखी एका तरुणाचा बळी गेल्यामुळे, गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी महाशक्ती ॲम्ब्युलन्स असोसिएशनचे अनिल चव्हाण आपल्या रुग्णवाहिकेसह तात्काळ दाखल झाले. मात्र, तोपर्यंत शिवाजी डेरे यांचा मृत्यू झाला होता.





