| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना अगदी सहज चढ-उतार करता यावी, यासाठी प्रवासी जेट्टीची उभारणी करण्यात आली आहे. या जेट्टीचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि.13) बंदर व मत्सविकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी खासदार सुनिल तटकरे अध्यक्षस्थानी होते. शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत राज्य हिस्सा निधीतून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे 111.41 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाकडून प्रकल्पास पर्यावरणीय मंजुरी प्राप्त झाली असून, सुमारे 250 मीटर लाटरोधक भिंतीचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्यामुळे या प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे 107 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
यावेळी नगराध्यक्षा आराधना दांडेकर, फैरोझ घलते, फोरिऑन इन्फ्रा सीईओ मिलिंद गायधनी, अजय सांगळे, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, मुरूड तहसीलदार आदेश डफळ, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, राजपुरी सरपंच सुप्रिया गिदी, प्रविण बैकर, महेश मानकर, उपसरपंच इस्माईल सिद्दीकी, नगरसेविका प्रीता चौलकर, आगरदांडा सरपंच आशिष हेदुळकर, आशिका ठाकुर, शीतल घरत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मंत्री नितेश राणे म्हणाले की, कोकणात पर्यटनाचा ओघ वाढत आहे. वर्षाला लाखो पर्यटक कोकणात पर्यटनासाठी येत असतात. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे जल मार्गाने जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून सागर माला योजनेअंतर्गत विविध ठिकाणी निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ही कामे लवकरच पुर्ण होतील, असे प्रतिपादन बंदर त्यांनी केले.
भरडखोल येथील मासेमारी बंदराचे भूमिपूजन
श्रीवर्धन तालुक्यातील कोळी बांधवांच्या अनेक वर्षांच्या मागणीची दखल घेत, भरडखोल येथील महत्त्वाच्या 137.22 कोटी रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या मासेमारी बंदराच्या बहुविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि.13) संपन्न झाला. राज्याचे बंदर आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे आणि खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. भरडखोल येथे केवळ जेट्टीचे काम न होता, एक स्मार्ट मत्स्यबंदर विकसित केले जात आहे. त्यामध्ये मच्छिमारांना नौका लावण्यासाठी सुरक्षित जेट्टी, मासळी लिलावासाठी आधुनिक शेड आणि अद्ययावत पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे मासळीची हाताळणी सुलभ होऊन माशांना योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी श्रीवर्धन सभापती सुचिन किर, जिल्हा परिषद सदस्या वासंती गुणाजी, म्हसळा सभापती बबन मनवे, पंचायत समिती सदस्य सुकुमार तोंडलेकर, भरडखोल सरपंच ज्योती काळपाटील, पदाधिकारी, भरडखोल मच्छिमार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







