। नागोठणे । प्रतिनिधी ।
मुंबई- गोवा महामार्गावर कानसई गावच्या हद्दीत दुभाजक ओलांडून महामार्गावरील दुसऱ्या बाजूला जात असताना ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात राजनाथ बैजनाथ राय (20), रा. एच 06, बी. सी. जिंदाल वर्कर कॉलनी, सुकेळी या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, भार्गव घोष (25) व सचिनकुमार राय (19), दोघेही रा. सुकेळी हे जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (दि. 12) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार भार्गव घोष हा तरुण या राजनाथ राय व सचिनकुमार राय यांच्यासह त्याच्या ताब्यातील हंटर मोटार सायकलवरून मुंबई -गोवा हायवे रोडने नागोठणे ते जिंदाल कॉलनी सुकेळी असा प्रवास करीत होते. हे तरुण रात्री कानसई बस स्टॉप जवळ आले असता ट्रेलर चालक याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याचे ताब्यातील ट्रेलर कानसई बसस्टॉप येथील दुभाजक ओलांडून वेगाने वळण घेऊन गोवा बाजूकडे चालवीत जात असताना त्याने तक्रारदार यांचे मोटार सायकलला जोराने धडक देऊन अपघात केला. या अपघातात भार्गव घोष व सचिनकुमार राय या दोघांना किरकोळ दुखापत झाली तर राजनाथ राय हा तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान ट्रेलर चालकाने अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरुन पळ काढला. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामधील अज्ञात ट्रेलर चालकाचा शोध सुरू असून, याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.







