मृतांमध्ये पती-पत्नीसह मुलगी अन् चिमुकलीचा समावेश
। सांगली । प्रतिनिधी ।
सांगली जिल्ह्यामधील विटा शहरात इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नीसह मुलगी आणि दोन वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.
विटा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर स्टील फर्निचरचे दुकान आहे. याच दुकानाला ही भीषण आग लागली आणि ती काही क्षणातच संपूर्ण इमारतीत पसरली. या आगीमध्ये इमारत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आई-वडील, मुलगी आणि नात अशा चौघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. विष्णु जोशी (47), सुनंदा विष्णु जोशी (42), प्रियांका योगेश इंगळे (25), सृष्टी इंगळे (2) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
सुदैवाने दोन मुलांनी प्रसंगावधान राखत गॅलरीतून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.





