| कळंबोली | प्रतिनिधी |
दिवाळी आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. पनवेलमधील कामोठे परिसरात केलेल्या धडक कारवाईत तब्बल 4 कोटी 21 लाख 6 हजार 961 रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित अन्नपदार्थांवर मिसब्रँडेड लेबलचा दोष आढळून आला असून, काही अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 24 ऑक्टोबर रोजी कामोठे येथील मेसर्स अजफान इंटरनॅशनल रिटेल्स एलएलपी या आस्थापनावर कारवाई केली. या कारवाईदरम्यान आस्थापनातील विविध अन्नपदार्थांच्या साठ्याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इम्पोर्टेड चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स आणि एनर्जी ड्रिंक्स यांसह विविध अन्नपदार्थांचा समावेश असल्याचे समोर आले. अन्नपदार्थांच्या लेबलिंगमध्ये आढळलेल्या त्रुटी तसेच त्यांच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर हा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात तरतुदींच्या उल्लंघनाच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे. संबंधित अन्नपदार्थ मिसब्रँडेड असल्याचे तसेच निकृष्ट दर्जाचे असण्याचा संशय असल्याने नमुने व साठ्याबाबत आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.







