सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग, मुरुड तालुक्यांना जोडणारा सहाण बायपास मार्गावरील पाल्हे पूल कमकुवत झाला असून, सुरक्षेच्या कारणास्तव या पुलावर अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घातली आहे. यासाठी येथे काही दिवसांपासून पोलीसही बसविण्यात आले आहेत. मात्र, तरीही अवजड वाहनांची वाहतूक दिवसाढवळ्या आणि जास्ती करुन रात्रीच्या वेळी सुरूच असल्याने येथे अपघाताचा धोका वाढला आहे.
या परिसरातून रस्त्याच्या कामासाठी जाणारे हायवा, ट्रक-ट्रेलर, डंपर तसेच अवजड मशीन वाहून नेणारी वाहने दररोज या पुलावरून जातात. विविध शाळांच्या बस, स्थानिक बांधकामासाठी वापरले जाणारे ट्रक, एसटी बसचीही वाहतूक याच पुलावरून होते. या पुलावर त्यामुळे हा जीर्ण पूल कोसळल्यास नवल वाटायला नको, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
अलिबागमार्गे मुरुड, रेवदंडा, नागावकडे जाणारा रस्ता याच पुलाद्वारे जातो. सध्या पुलाचा पाया, खांब आणि स्लॅब धोकादायक अवस्थेत आहेत. पाच महिन्यांपासून या पुलाच्या डागडुजीचे काम अद्याप सुरूच आहे. त्यामुळे हा पूल जड वाहनांसाठी अतिधोकादायक आहे. मे-जून महिन्यात हा पूल जीर्ण झाल्याची अवस्था उघड झाली होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल अवजड व उंच वाहनांसाठी बंद केला आहे. मात्र, अजूनही या पुलावरून अवजड वाहतूक होत असल्याने येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
वेळीच लक्ष न दिल्याचा परिणाम
पाल्हे पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. परंतु, योग्य वेळी लक्ष न दिल्याने आज या पुलाची दुरवस्था झाली आहे. याला सर्वस्वी बांधकाम विभाग जबाबदार आहे. एकाच वेळी बेली आणि पाल्हे पुलाजवळ ‘पूल कमकुवत' असे सूचना फलक लावून जबाबदारी झटकण्यापलीकडे बांधकाम विभागाने काहीच केलेले नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे जर पूल कोसळला, तर त्याला बांधकाम विभागाचा दुर्लक्षित कारभार जबाबदार असेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.







