| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरात सोमवारी (दि.10) मध्यरात्री बौद्धवाडा परिसरात एका घराला आग लागल्याची घटना घडली होती. या भीषण आगीत होरपळलेल्या रमेश कांबळे (42) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, त्यांची पत्नी आणि मुलगी यांची देखील परस्थिती नाजून असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
उरणमधील मासळी मार्केटजवळील बौद्धवाडा परिसरातील रमेश कांबळे यांच्या घराला सोमवारी मध्यरात्री आग लागली. घटनेच्या वेळी तिघेही झोपेत होते. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण घराला वेढले. रमेश, त्यांची पत्नी आणि मुलगी या तिघांनाही गंभीर भाजल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, मंगळवारी (दि.11) सकाळी रमेश कांबळे यांची मृत्यूशी झुंज संपली. त्यांच्या निधनाने बौद्धवाडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी सायंकाळी उरण येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेश कांबळे यांची पत्नी आणि मुलगी निकिता यांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.







