वांगणी कर्जतदरम्यानच्या फाटकांचा समावेश
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत येथे मध्य रेल्वे कडून बनवण्यात येत असलेला कारशेड आणि पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग यामुळे मध्य रेल्वेवरील या मार्गाचे महत्त्व वाढणार आहे. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वेचे मेन लाइन मार्गावर उपनगरीय रेल्वेच्या जलद प्रवासासाठी वांगणी ते कर्जतदरम्यान असलेली दहा रेल्वे फाटक बंद करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्यातील काही ठिकाणी उड्डाण पूल बांधण्याचे प्रयोजन मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून सुरू असून, 226 कोटींचा हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
मध्य रेल्वेचे मेन लाइनवरील उपनगरीय लोकल वाहतूक जलद व्हावी यासाठी मोठी पावले उचलली जात आहेत. मेन लाइनवरील कल्याण ते कर्जत दरम्यान असलेली 10 लेव्हल क्रॉसिंग गेट्स कायमस्वरूपी बंद करण्याचे हालचाली सुरू आहेत. कल्याण ते कर्जत या उपनगरीय विभागात सध्या वांगणी ते कर्जत येथे 10 रेल्वे फाटक कार्यरत आहेत. त्यात बदलापूर वांगणी दरम्यान एक, वांगणी शेलू दरम्यान दोन, शेलू ते नेरळदरम्यान एक, तर नेरळ ते भिवपुरी रोडदरम्यान दोन आणि भिवपुरी रोड ते कर्जत या दरम्यान दोन फाटके आहेत. मेन लाइनवरील या मार्गावर दिवसातून अनेकदा ही सर्व फाटक वाहन वाहतुकीसाठी खुली करण्यात येतात. दरवेळी फाटक उघडे असताना रेल्वे वाहतूक काही मिनिटांसाठी थांबवावी लागते. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात सातत्याने येतो. परिणामी, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
रेल्वेच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक फाटकावर दिवसातून किमान तीस ते चाळीस वेळा फाटक बंद-उघड करण्याची प्रक्रिया पार पडते. त्यामुळे केवळ या विभागातच लोकल गाड्यांचा सरासरी आठ ते दहा मिनिटांचा वेळ वाया जातो. फाटक बंद झाल्यावर रस्त्यांवरील वाहतूकही ठप्प होते. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते या दोन्ही वाहतुकीवर विपरित परिणाम होत असल्याने रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी उड्डाण पूल उभारली जाऊ शकतात का, याचा अभ्यास सुरू आहे. रेल्वे फाटक बंद करून रोड ओव्हर ब्रिज उभारल्यास लोकल गाड्यांना ग्रीन कॉरिडॉर मिळेल. या मार्गावर गाड्यांचा प्रवास अधिक वेगवान आणि वेळेत पूर्ण होणार आहे. याशिवाय, रस्त्यांवरील वाहतूक कोंडीही कमी होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. त्यामुळे या मार्गावरील लोकल वाहतुकीला ग्रीन कॉरिडॉर मिळणार आहे. परिणामी, या मार्गावरील गाड्यांच्या वेगात लक्षणीय वाढ होणार असून, लोकल गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारण्यास मदत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
कोट्यवधींचा होणार खर्च
236 कोटींचा खर्च करण्याची तयारी सुरू केली असून मध्य रेल्वेने 10 फाटक कायमस्वरूपी बंद करून त्याजागी आधुनिक रोड ओव्हर ब्रिज बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या 10 उड्डाणपुलांसाठी सुमारे 236 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, त्यांच्या जागी नवे रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) उभारण्यात येणार आहेत.
बंद होणारी फाटकं
देउलवाडी-पुलाचीवाडी, सावरगाव, कोषाणे, भिवपुरी-चिंचवली, आंबिवली, नेरळ, दामत, शेलू, डोणे, वांगणी.







