सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील नगर परिषदेपासून बुद्धनगर कडे जाणाऱ्या वळणावर शनिवारी (दि.15) रोजी दुपारी झालेल्या एका विचित्र अपघाताने परिसरात एकच खळबळ माजली. सुदैवाने मोठी हानी टळली असली तरी पाच ते सहा दुचाकींना धडक देत वेगात आलेली टाटा हरिअर गाडी अखेर बुद्धनगर वस्तीच्या कमानीला जाऊन आदळली.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा हरिअर गाडीचा चालकाला अचानक ब्रेक न लागल्याने वाहन पूर्णपणे अनियंत्रित झाले. समोरून येणाऱ्या दोन दुचाकीना गाडीने जोराची धडक दिल्यानंतर चालकाने रिव्हर्स टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पाठीमागे असलेल्या आणखी दोन आणि पुन्हा पुढे जोरात घेऊन दोन दुचाकी उडवल्या. त्यानंतर बुद्धनगर समोरील कमानीला कार आदळली.
यावेळी या गाडीत दोन व्यक्ती प्रवास करत होते. चालकाच्या चुकीमुळे झालेल्या धडकेत गाडीचा एअरबॅग तात्काळ उघडल्याने दोन्ही व्यक्ती गंभीर दुखापतीपासून बचावले. मात्र त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातात रस्त्यावरील दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच गाडीने बुध्दनगर येथील कमानीला दिलेल्या धडकेत कमानीचे किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.






