। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सौदी अरेबियातील मदिना येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातामध्ये 42 भारतीय नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडल्याची भीती व्यक्त केली आहे. सौदीतील बद्र-मदिना महामार्गावर रविवारी (दि. 16) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याठिकाणी प्रवासी बस आणि एका डिझेल टँकरची जोरदार धडक झाली. ही धडक झाल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला. त्यामुळे प्रवाशांच्या बसला आग लागून त्यामधील प्रवाशी मृत्युमुखी पडले. या बसमध्ये मदिना येथे तीर्थयात्रेसाठी गेलेले भारतीय नागरिक होते. यापैकी 42 नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे सर्वजण हैदराबाद आणि तेलंगणा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.







