शेकापकडून रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन
| पनवेल | प्रतिनिधी |
तालुक्यातील वावंजे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने विभागातील बेरोजगार युवा आणि युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन रविवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याचे आयोजन अतुल म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषद उमेदवार डी.बी. म्हात्रे यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार बाळाराम पाटील होते.
यावेळी बाळाराम पाटील यांनी सांगितले की, शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच युवकांच्या भल्यासाठी काम करत असून, सध्या पनवेल तालुक्यात रोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा विचार करून सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या आयोजनाचा लाभ येथील स्थानिक युवक आणि युवती घेतील, असा मला विश्वास वाटतो. यावेळी पनवेल तालुका पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, नारायण घरत, प्रकाश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्यात 12 कंपन्या आल्या होत्या. त्यामध्ये जवळजवळ 92 मुलांना ऑन द स्पॉट रोजगार देण्यात आला. सहभागी कंपन्यांमध्ये लिंक किड्स, एच.डी.एफ.सी, एस.बी.आय, कोटक ऍक्सिस स्टार्टर्स, आय.सी.आय.सी. बँक आणि खास करून पनवेल गव्हर्मेंट प्लेसमेंट ऑफिस हेसुद्धा सहभागी झाले होते.
या रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी वावंजे जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार डी.बी. म्हात्रे, पनवेल तालुका पंचायत समितीचे उमेदवार पराग भोपी, सरपंच मदन मते (कानपोली), भोलानाथ पाटील (वलप), मच्छिंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल, ए.टी. पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.







