छायाचित्रांमुळे चर्चेला उधाण
| पनवेल | दीपक घरत |
कळंबोली गावातील स्मशानभूमीत अघोरी विधीसाठी राख चोरी होत असल्याच्या संशयाची बातमी प्रसिद्ध होताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. “कळंबोली स्मशानभूमीत राख चोरी” या मथळ्याखाली दैनिक कृषीवलमध्ये मंगळवारी (दि. 10) प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी कृषीवलशी संपर्क साधत स्मशानभूमीत अघोरी पद्धतीने पूजा केल्याचा संशय व्यक्त करत काही धक्कादायक छायाचित्रे उपलब्ध करुन दिली आहेत.
समोर आलेल्या या छायाचित्रांमध्ये कळंबसेनर येथील स्मशानभूमी परिसरात संशयास्पद पद्धतीने पूजा साहित्य मांडलेले दिसून येत आहे. राखेच्या ढिगाऱ्याजवळ काही विचित्र चिन्हे तसेच संशयास्पद साहित्य ठेवण्यात आल्याचेही स्पष्ट दिसत असल्याने अघोरी प्रकार घडत असल्याच्या संशयाला अधिक बळ मिळाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा काही अज्ञात व्यक्ती स्मशानभूमी परिसरात येत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. त्यामुळे स्मशानातील राख चोरी करून अघोरी विधी केले जात असल्याचा संशय अधिक गडद झाला असून, या प्रकाराबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराची प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी तसेच स्मशानभूमी परिसरात सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
संशयास्पद हालचाली
स्मशानभूमी परिसरात संशयास्पद हालचाली वाढल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला असून, या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रात्री पोलीस गस्त वाढवावी आणि राख चोरी तसेच अघोरी विधींबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.






