रेवदंड्यातील जेट्टीस कोळी बांधवांचा विरोध
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा समुद्र खाडीत उत्तरेस महाराष्ट्र सागरी मंडळाच्यावतीने जलवाहतूक रो-रो जेट्टी नव्याने बांधण्यात येणार आहे. या जेट्टीस कोळी बांधवांचा विरोध आहे. त्याबाबतचे निवेदन पत्र दर्यातंरग सागरी मच्छिमार वि.का.स. संस्था मर्यादित रेवदंडा-चौलच्यावतीने महाराष्ट्र सागरी मंडळास देण्यात आले आहे.
रेवदंड्यात सागरी जलवाहतुकीसाठी रो-रो. जेट्टी शासनाच्यावतीने बांधण्यात येत आहे. सदर ठिकाण रेवदंडा समुद्र खाडीत दर्यातंरग सागरी मच्छिमार वि.का.स.संस्था मर्यादित रेवदंडा-चौल या संस्थेचे कार्यक्षेत्रात असून, सदर जलवाहतूक रो-रो. जेट्टी कुंडलिका नदीच्या दक्षिणेस व रेवदंडा-साळाव पुलाच्या पश्चिमेस बांधण्यात येत आहे. या जेट्टीस स्थानिक कोळी बांधवांचा विरोध असून, तसे पत्र महाराष्ट्र सागरी मंडळास दर्यातंरग सागरी मच्छिमार वि.का.स.संस्था मर्यादित रेवदंडा-चौल यांनी दिले आहे. शिवाय, या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी अलिबाग, तहसीलदार अलिबाग, प्रादेशिक बंदर अधिकारी, रेवदंडा सागरी मंडळ बंदर अधिकारी यांना दिले आहे.
सदर जलवाहतूक रो-रो. जेट्टी बांधल्याने स्थानिक मच्छिमारांचे मच्छी उतरविणे, जाळी उतरविणे, तसेच जेट्टीच्या समोरील जाळी बांधण्याचे ठिकाण कायमस्वरूपी नष्ट होणार आहे, तसेच रेवदंडा-कोर्लईच्या चॅनेलमधून रो-रो. नौका येताना व जाताना, मच्छिमाऱ्यांच्या जाळीचे नुकसार होणार आहे. या समस्येचा विचार करून संबंधित खात्याचे अधिकारी, ठेकेदार व संस्थेची संयुक्त सभा घेण्यात यावी. शिवाय, स्थानिक मच्छिमार बांधवांना प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावे व शासनाने होणारी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या निवेदनपत्रामध्ये दर्यातंरग सागरी मच्छिमार वि.का.स.संस्था मर्यादित रेवदंडा-चौल यांच्यावतीने करण्यात आली आहे. एकदंरीत, विकासकामाला विरोध नाही, परंतु समस्यांचा विचार जरूर करावा, त्या दूर कराव्यात असे म्हटले आहे. सदर निवेदन पत्राची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेदण्याचा इशारा दर्यातंरग सागरी मच्छिमार वि.का.स. संस्था मर्यादित रेवदंडा-चौल यांच्यावतीने देण्यात आला आहे.







