| उरण | घनश्याम कडू |
उद्या देशभर तिरंगा डौलाने फडकेल… राष्ट्रगीताने आसमंत भारून जाईल… स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची गाथा सांगितली जाईल. पण, याच स्वातंत्र्याच्या उत्सवापासून काही हात अजूनही दूर आहेत. कारण, ज्या वयात हातात दप्तर असायला हवे, त्या हातात पोटाची भूक भागवण्यासाठी धडपड आहे; ज्या डोळ्यांत खेळण्यांची स्वप्ने असायला हवीत, त्या डोळ्यांत ‘आज किती विक्री होईल?’ ही चिंता आहे. स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही रायगडसह उरणच्या रस्त्या-रस्त्यावर दिसणारे हे चित्र देशाच्या विकासाच्या बढाया मारणाऱ्यांसाठी अंतर्मुख करणारे आहे.
भारत स्वतंत्र झाला; देशाने विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती केली. महासत्ता होण्याची स्वप्ने पाहिली जात आहेत. मात्र, या विकासाच्या झगमगाटाच्या सावलीत पोटासाठी रस्त्यावर उभे असलेली लहान मुले आजही आपल्या व्यवस्थेला प्रश्न विचारत आहे. रायगड जिल्ह्यासह उरण तालुक्यात अनेक ठिकाणी लहान मुले विविध वस्तू विकताना, ग्राहकांच्या मागे फिरताना दिसतात. एखादा ग्राहक वस्तू घेतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर समाधान उमटते; पुढच्याच क्षणी पुन्हा दुसऱ्या ग्राहकाच्या शोधात त्यांची धावपळ सुरू होते. त्यांच्या या धावपळीत शाळा कुठे आहे? खेळ कुठे आहे? बालपण कुठे आहे? ज्या वयात मुलांनी शाळेची घंटा ऐकावी, शिक्षकांचे शब्द ऐकावे, मित्रांसोबत खेळावे आणि उद्याची स्वप्ने रंगवावीत, त्या वयात त्यांना भुकेशी दोन हात करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही वस्तुस्थिती केवळ त्या कुटुंबाची शोकांतिका नाही; ती संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेची परीक्षा आहे. परंतु, राजकीय फोडाफोडीच्या उद्योगात मग्न असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अशा मुलांकडे पाहण्यासाठी, त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ मिळेल का?
गरिबी निर्मूलनाच्या घोषणा झाल्या. बालकल्याणासाठी योजना आल्या. शिक्षणाचा अधिकार मिळाला. मुलांच्या पोषणासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते. मग या चिमुकल्यांच्या आयुष्यात या योजनांचा प्रकाश पोहोचत का नाही, हाच गंभीर सवाल आहे. कागदावर बालकांचे भविष्य उज्ज्वल आणि प्रत्यक्षात त्यांना दोन वेळच्या भुकेसाठी काबाड कष्ट करावे लागतात, हा विरोधाभास प्रशासनाच्या नजरेतून कसा सुटतो? उद्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांत देशाच्या प्रगतीचे पोवाडे गायले जातील. तिरंग्याला सलामी दिली जाईल. पण, रस्त्याच्या कडेला पोटासाठी वस्तू विकणाऱ्या त्या मुलाच्या डोळ्यांतील प्रश्नाकडे कोण पाहणार?
चिमुकल्याचे स्वातंत्र्य कधी?
देशाचा तिरंगा उंच फडकेल; पण त्याच तिरंग्याखाली एखादे बालपण भुकेने वाकलेले असेल, तर आपली मान अभिमानाने किती उंच राहणार? रस्त्यावरील चिमुकल्यांच्या हातात उद्या विक्रीचा माल नव्हे, तर पुस्तक असावे… पोटाची चिंता नव्हे, तर भविष्याचे स्वप्न असावे… कारण, तिरंग्याला खरी मानवंदना तेव्हाच मिळेल, जेव्हा देशातील एकही मूल भुकेसाठी आपले बालपण विकायला रस्त्यावर उतरणार नाही! परंतु, विकासाचे प्राधान्यक्रम बदलणाऱ्यांना याचे गांभीर्य कधी कळणार, हाच खरा सवाल आहे.





