| पनवेल | प्रतिनिधी |
क्रेडाई एमसीएचआय रायगड युनिटने मॅरियट एक्झिक्युटिव्ह अपार्टमेंट्स नवी मुंबई येथे “रिअल इस्टेटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ग्रीन बिल्डिंग” या विषयावर एक माहितीपूर्ण सेमिनार आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नवी मुंबई आणि रायगड विभागातील सुमारे 75 बांधकाम व्यावसायिक आणि डेव्हलपर्सनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच या क्षेत्रातील विविध बांधकाम व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते.
या सेमिनारमध्ये केसरी इन्फ्राबिल्ड एलएलपीचे संचालक के. श्रीनिवासन यांनी ग्रीन बिल्डिंगवर सखोल सादरीकरण करत ग्रीन बिल्डिंग संकल्पना स्वीकारण्याचे महत्त्व सांगितले आणि ती लागू केल्याने बांधकाम व्यावसायिकांना होणाऱ्या विविध फायद्यांवर प्रकाश टाकला. तर कायझेन एआयचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जय शाह यांनी रिअल इस्टेटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भूमिकेबद्दल मौल्यवान माहिती देत प्लॅनिंग नियमांचे उल्लंघन न करता अतिरिक्त बिल्ट-अप एरिया तयार करण्यासाठी मोकळ्या जागांचा वापर ऑप्टिमाइझ करण्याच्या अभिनव पद्धती समजावून सांगितल्या. दोन्ही वक्त्यांनी आपापल्या विषयांवर अत्यंत माहितीपूर्ण आणि दूरदृष्टीकोन असलेले विचार मांडले. यावेळी सहभागींनी प्रश्नोत्तरांच्या सत्रात सक्रिय सहभाग घेतला आणि वक्त्यांनी सर्व प्रश्नांची सर्वसमावेशक उत्तरे दिली. पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये आणि क्रेडाई एमसीएचआयचे सीओओ केवल वळंभिया या सेमिनारला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये यांनी आपल्या भाषणात सदस्यांना पनवेल महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी आणि आक्रमक वृक्षारोपण मोहिमेबद्दल माहिती दिली, ज्यामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रात 1 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर क्रेडाई एमसीएचआय रायगडचे अध्यक्ष अरविंद सावळेकर यांनी सर्व बांधकाम व्यावसायिक आणि डेव्हलपर्सच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल स्वागत केले. या कार्यक्रमासाठी आयोजनासाठी उपाध्यक्ष हितेंद्र घाडिया, समिती सदस्य प्रतीक पोटे, आशियान खोत, जितेश अग्रवाल, अनिरुद्ध सावळकर, तसेच इतर व्यवस्थापकीय समिती सदस्यांनी मोठे योगदान दिले. या कार्यक्रमाला ऋषभ प्रजापती यांनी एमओसी म्हणून काम केले. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सचिव राकेश प्रजापती यांनी केले.






