| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल व आजूबाजूचे परिसरात विविध ठिकाणी घरफोडी चोरी करणाऱ्या दुकलीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत भिंगारवाडी येथील बिअर शॉप मध्ये चोरीची घटना घडली होती. या गुन्ह्याची नोंद होताच पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3, पनवेल प्रशांत मोहिते, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंदा कांबळे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक अनुरुध्द गिजे, पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपुत, पोहवा विजय देवरे, पोहवा महेश धुमाळ, पोहवा सुनिल कुदळे, पोहवा सतिष तांडेल, पोहवा शिवाजी बाबर, पोहवा भूषण म्हारसे, पोशि आकाश भगत, पोशि भिमराव खताळ आदींच्या पथकाने गोपनिय माहिती प्राप्त करुन तसेच तांत्रिक तपासाद्वारे आरोपी नामे सुदाम भगवान वाघे (26) व विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न करुन त्यांना पनवेल परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे करण्यात आलेल्या तपासा दरम्यान त्याच्याकडून दोन मोबाईल, एक मोबाईल चार्जर, गुन्हयामध्ये वापरलेली मोटारसायकल, गुन्हा करतांना सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत असलेले त्यांचे अंगावरील कपडे व 29 हजार रोख रक्कम असा एकूण 65 हजार तीनशे रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे. संबंधित गुन्हेगारांवर पनवेल तालूका पोलीस ठाणे, खालापूर पोलीस ठाणे आणि रसायनी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.







