| पनवेल | प्रतिनिधी |
सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूखंडावर बेकायदा डेब्रिज टाकणाऱ्या डंपरबरोबर त्यांच्या चालकांना रंगेहाथ पकडून या प्रकारांना आळा घालण्यासाठी सिडको प्रशासनाने कंबर कसली आहे. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नवी मुंबई परिसरात डेब्रीज टाकणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. धाकटा खांदा, कामोठे येथील काळसेकर कॉलेजच्या बाजुला उघड्यावर डेब्रीज टाकणाऱ्या दोन डंपर्सवर पथकाने कारवाई करून ते जप्त केले आहेत. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात संबंधित डम्पर चालकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुंबईतील राडा रोडा नवी मुंबई परिसरात उघड्यावर गुपचूपपणे टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, आभियांत्रिकी विभाग व नवी मुंबई पोलिस विभाग यांच्यासमवेत पथकाने सिडको कार्यक्षेत्रात मोहिम राबवत असतांना दि. 14 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास दोन डंपर्समधील चालक अनुक्रमे भर राधेश्याम पांडे (45) व तुलशीप्रसाद जगदीशप्रसाद (28), हे दोघेचालक आपल्या ताब्यातील डंपर्समधून मानवी आरोग्यास धोकादायक असलेले डेब्रीज काळसेकर कॉलेजच्या बाजुला धाकटा खांदा कामोठे टाकत असतांना मिळून आले. सदरचे दोन्ही डंपर जप्त करण्यात आले असून, याबाबत उपरोक्त चालकांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







