| कोलकाता | वृत्तसंस्था |
कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा शेवट असा होईल, असा कोणी विचारही केला नसेल. या सामन्याचा निकाल अवघ्या अडीच दिवसात लागला. पुन्हा एकदा भारतीय फलंदाज मायदेशात खेळताना फिरकी गोलंदाजांविरूद्ध संघर्ष करताना दिसून आले. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या 124 धावा करायच्या होत्या. एकापेक्षा एक स्टार फलंदाज असलेल्या भारतीय फलंदाजीक्रमासाठी हे आव्हान फार नव्हतं. पण भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या 35 षटकात 93 धावांवर आटोपला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 159 धावा संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला अवघ्या 189 धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने पहिल्या डावात अवघ्या 30 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचे सुरूवातीचे 7 फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. पण त्यानंतर कॉर्बिन बॉश आणि तेंबा बावुमा यांनी मिळून संघाची धावसंख्या 153 धावांवर पोहोचवली. भारताला हा सामना जिंकण्यासाठी 124 धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 93 धावांवर आटोपला. यासह दक्षिण आफ्रिकेने हा सामना 30 धावांनी आपल्या नावावर केला.

सायमन हार्मर ठरला विजयाचा हिरो
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू सायमन हार्मर दोन्ही डावात भारतीय फलंदाजांवर भारी पडला. दोन्ही डावात मिळून त्याने 8 गडी बाद केले. यासह सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात सर्वाधि 5 गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 गडी बाद केले. दोन्ही संघातील गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण फलंदाजांना हवं तितकं योगदान देता आलं नाही.
भारतात 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं
या सामन्यातील 4 डावात मिळून अवघ्या 594 धावा बनल्या. ही भारतात कसोटी क्रिकेट खेळताना संयुक्तरित्या सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 2004 मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चारही डावात मिळून 604 धावा बनवल्या गेल्या होत्या. त्यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्याचा निकाल अवघ्या तिसऱ्या दिवशी लागला होता. पण भारतीय संघाने या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय मिळवला होता.







