पीडिता सहा महिन्यांची गर्भवती
| महाड | प्रतिनिधी |
महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत महिला अत्याचार आणि अल्पवयीनांवरील लैंगिक गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच तालुक्यातील आणखी एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विधी संघर्षित मुलाने 16 वर्षीय मुलीशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि विधी संघर्षित मुलगा दोघेही अल्पवयीन असून, काही दिवसांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. या प्रेमसंबंधांचे रूपांतर नंतर शारीरिक संबंधांमध्ये झाले. विधी संघर्षित मुलाने पीडितेला आपल्या मानलेल्या बहिणीच्या घरी नेले आणि तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, अशी तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली आहे. या संबंधांमुळे पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर मुलीला तातडीने उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, तिची आरोग्यस्थिती तपासली जात आहे. दुसरीकडे, 16 नोव्हेंबर रोजी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने करीत आहेत. महाड परिसरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर आणि प्रभावी उपाययोजनांची मागणी होत आहे.







