| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत- मुरबाड रस्त्यावरील खड्डे बुजवून एक अनोखा उपक्रम जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने ग्रामस्थांनी श्रमदान करून खड्डे भरले. ग्रामस्थांनी सरकारच्या निर्दयी भूमिकेमुळे आणि खड्डे भरले जात नसल्याने होणारे अपघात लक्षात घेऊन खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे.
कर्जत मुरबाड रस्त्यावरील खड्ड्यांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कर्जत मुरबाड रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात या राज्यमार्ग रस्त्यावर कशेळे भागात जय भवानी माता मंदिर, भाऊसाहेब राऊत विद्यालय मंदिर समोरील रस्त्यावरील खड्डे यामुळे वारंवार अपघात यामध्ये टू व्हीलर चालक पडून एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने तर झोपेचे सोंग घेतलेला दिसून येत आहे. मोठमोठे अपघात होताना दिसत आहेत. तरीही या मोठ्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून एमएमआरडीसी या होणाऱ्या अपघातांना सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही, हे लक्षात घेऊन कशेळे येथील जय हनुमान क्रीडा मंडळ हे दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत आपल्या स्वखर्चाने व मेहनतीने स्वतः अशा प्रकारचे खड्डे भरण्याचे काम करत आहे. शनिवार (दि.22) नोव्हेंबर रोजी सामाजिक बांधिलकी जपत समाजाची सेवा करण्यासाठी या मंडळाने पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजवत नागरिकांचा प्रवास सुखकार करण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमामुळे प्रवासी वर्गात समाधान व्यक्त केले आहे.
या रस्त्याचे खड्डे भरण्यासाठी जय हनुमान क्रीडा मंडळ कशेळेचे अध्यक्ष आत्माराम खंडागळे, केदार गावकर, अरुण हरपुडे, रामदास घरत, संजय जाधव, दत्ता खराट, रवींद्र शेळके, रवींद्र मते, मारुती शेळके, सदानंद मते, मधुकर राणे, प्रवीण मते, सुधीर मते, संदीप खंडागले, मंगेश फराट, ज्ञानेश्वर शेळके, मंगेश भोईर, अनंता म्हसे, युवराज मेढे, संजय मते, शिरीष मेढे, प्रभाकर दिसले, सचिन फराट, संदीप ठोंबरे, प्रतीक फराट, या सर्वांनी अंग मेहनत करून खड्डे बुजवण्याचे काम केले.







