पनवेलमधील सहा केंद्रांमध्ये होणार परीक्षा; सहा हजार 74 शिक्षक बसणार परीक्षेला
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी दि.23 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. टीईटी परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. परीक्षेत कोणी गैरप्रकार करताना आढळल्यास थेट फौजदारी कारवाई होणार आहे. सर्व शिक्षकांना (टीईटी) शिक्षक पात्रता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असून, पनवेलमधील सहा केंद्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गांवर नियुक्ती असलेल्या शिक्षकांना टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य आहे. रायगड जिल्ह्यातून सहा हजार 74 शिक्षक या परीक्षेला बसणार आहेत. या परीक्षेची तयारी शिक्षण विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील कळंबोली येथील सु.ए. सो. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवीन पनवेलमधील सिडको कॉलनी येथील चांगू काना ठाकूर विद्यालय, के.ए. बाठींया माध्यमिक विद्यालय, नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ माध्यमिक विद्यालय, जुने पनवेलमधील सावरकर चौक येथील को.ए. सो के.व्ही. कन्या विद्यालय आणि ज्यूनिअर कॉलेज, को.ए.सो. व्ही.के. विद्यालय अशा एकूण सहा शाळांमधील केंद्रामध्ये परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
पहिली ते पाचवीच्या वर्गातील शिक्षकांची परीक्षा सकाळी साडेदहा ते एक या वेळेत होणार आहे. त्यांच्यासाठी पेपर एक असणार आहे. या परीक्षेसाठी दोन हजार 515 शिक्षक परीक्षेला बसणार आहेत. सहावी ते आठवीच्या वर्गातील शिक्षकांची परीक्षा दुपारी अडीच ते पाच यावेळेत होणार आहे. त्यांच्यासाठी पेपर दोन असणार आहे. या परीक्षेला तीन हजार 459 शिक्षक बसणार आहे. पहिला आणि दुसरा पेपर प्रत्येकी दीडशे मार्कांचा असणार आहे. पहिला पेपर भाषा 30, भाषा 30, गणित 30, परिसर अभ्यास 30, बालमानस अध्यापन शास्त्र 30 गुण अशा पद्धतीने असणार आहे. दुसरा पेपर भाषा 30, भाषा 30, बालमानस अध्यापन शास्त्र 30 आणि गणित तसेच समाज शास्त्रसाठी प्रत्येकी 60 गुण अशा पद्धतीने असणार आहे.
केंद्र संचालकापासून अनेकांची नेमणूक परीक्षा केंद्रामध्ये करण्यात आली आहे. परीक्षेच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, लिपिक, विस्तार अधिकारी यांची यामध्ये नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
काटेकोर उपाययोजना
परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी व परीक्षेतील गैरप्रकारांना पूर्णविराम देण्यासाठी शिक्षण विभागाने यंदा अधिक काटेकोर उपाययोजना राबविल्या आहेत. परीक्षा परिषदेकडून बायोमेट्रिक हजेरी, परीक्षार्थीच्या चेहऱ्याची ओळख करण्यासाठी फेस स्कॅनिंग, सीसीटीव्ही यांसह यंदा प्रथमच कनेक्ट व्हू व फोटो व्हू या दोन प्रणाली कार्यान्वित करणेत आल्या आहेत.
‘एआय'ची घेणार मदत
एआय सीसीटीव्ही प्रत्येक केंद्रावर 24 तास रेकॉर्डींग करणारी एआय आधारित सीसीटीव्ही यंत्रणा चेहरा व ध्वनीतरल विचलन टिपणार आहे. फोटो व्हू प्रणालीमुळे उमेदवाराचा मूळ फोटो स्क्रीनवर दिसेल. प्रत्यक्ष बसलेला विद्यार्थी व नोंदणीतील फोटो यातील फरक एआय तंत्रज्ञानाने त्वरित शोधला जाईल. कनेक्ट व्हू प्रणालीमुळे केंद्रप्रमुख व कंट्रोल रूम यांच्यात लाईव्ह कनेक्ट राहणार आहे. बायोमेट्रिक, फेस स्कॅनिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या बोटांचे छाप व चेहरा स्कॅन केला जाणार आहे. परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. टीईटी परीक्षेचे जिल्हास्तरीय अध्यक्ष जिल्हाधिकारी रायगड आणि उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अलिबाग आहेत.
गैरप्रकार केल्यास फौजदारी
परीक्षे दरम्यान कोणी काही गैरप्रकार केल्यास फौजदारी करण्यात येणार आहे. परीक्षार्थींनी या सूचना लक्षात ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षा परिषदेकडून बायोमेट्रिक हजेरी, परीक्षार्थीच्या चेहऱ्याची ओळख पटविण्यासाठी फेस स्कॅनिंग, सीसीटीव्ही यांसह यंदा प्रथमच कनेक्ट व्ह्यू व फोटो व्ह्यू या दोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. एआय सीसीटीव्ही प्रत्येक केंद्रावर 24 तास रेकॉडिंग करणारी एआय आधारित सीसी टीव्ही यंत्रणा, चेहरा व ध्वनीतरल विचलन टिपणार आहे. परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
–ललिता दहिदुले,
प्राथमिक शिक्षणाधिकारी, राजिप







