| उरण | प्रतिनिधी |
उरण परिसर औद्योगिक दृष्ट्या झपाट्याने विकसित होत असताना या ठिकाणी परप्रांतीयांची वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्याच वाढीने आता गंभीर प्रश्न उभे राहत आहेत. उरणमधील परप्रांतीयांपैकी अनेकांची नावे उरण विधानसभा मतदार यादीत आणि त्यांच्या मूळ गावालाही असल्याचे उघड होत आहे. म्हणजेच एकच व्यक्ती दोन ठिकाणी मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. त्यामुळे ही दुबार नावे केवळ निवडणूक प्रक्रियेचा भंग नाही, तर उरणमधील उमेदवारांच्या मतांवर सरळ घाला असल्याचा सूरदेखील स्थानिकांमधून उमटू लागला आहे. या संदर्भात अनेक वेळा लेखी तक्रारी देऊनही निवडणूक आयोग पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप देखील स्थानिकांकडून होत आहे. तसेच, काही जबाबदार मतदारांनी स्वतःहून अर्ज करून, माझे नाव दोन ठिकाणी असून ते एकाच ठिकाणी ठेवावेत,असे स्पष्टपणे सांगूनही आयोगाकडून दुरुस्तीची तसदी घेतली गेली नाही. त्यामुळे संपूर्ण मतदार यादीत पारदर्शकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या उरणमध्ये परप्रांतीयांची नावांची संख्या मोठी असल्याने मतांचा ताळेबंदच बिघडू शकतो, असा भीतीचा सूर अनेक उमेदवार आणि स्थानिक नागरिकांमधून होत आहे.







