शेतकरी कामगार पक्षाची मागणी
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
शेडुंगपासून ते बेलवलीकडे जाणाऱ्या खराब रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मंडळ सदस्य, पनवेल तालुका वसंत काशिनाथ फडके यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पत्राद्वारे केली.
पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत भिंगारमधील शेडुंग ते बेलवलीकडे जाणारा रस्ता खराब झालेला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्या संदर्भात अनेकदा फोनवर आणि प्रत्यक्षात पत्र देखील देऊन चर्चा झाली. मात्र अद्यापही या रस्त्याचे डागडुजी करण्यात आलेली नाही. पावसाळा संपला असून गणपती, दसरा, दिवाळी देखील संपली. सध्या लग्नसराई सुरू झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होईल असे असतानाही या खराब रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत नाही. खराब रस्त्यामुळे बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याची तातडीने डागडुजी होणे गरजेचे असल्याचे वसंत फडके यांचे म्हणणे आहे. येत्या दहा दिवसात रस्ता दुरुस्त झाला नाही तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कार्यालयावर मोर्चा, आंदोलन करावे लागेल, असा इशारा वसंत फडके यांनी दिला आहे.







