| रायगड | प्रतिनिधी |
हिवाळा सुरू होताच सर्वसाधारणपणे भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने दर कमी होत असतात. मात्र, यंदा हवामानातील लहरीपणा, परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि बाजारात येणाऱ्या मालातील घट यामुळे भाज्यांचे किरकोळ तसेच घाऊक दर झपाट्याने वाढले आहेत. त्यातच मार्गशीर्ष महिना सुरू झाल्याने सात्त्विक पदार्थ, नैवेद्य आणि उपवासांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्यांची मागणी वाढल्याने दरवाढ आणखी प्रकर्षाने जाणवत आहे.
बाजारात हिवाळ्याच्या सुरुवातीला साधारणतः चांगल्या प्रतीचा भाजीपाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे काही भाज्यांचे दर वाढले तरी बाजारात आवश्यक प्रमाणात माल मिळत राहतो आणि किमती स्थिर राहतात. परंतु, यंदा लांबलेल्या पावसाचा फटका आणि ढगाळ वातावरणामुळे अनेक पिकांवर बुरशी, सड आणि फुलगळती झाली आहे. परिणामी विक्रीयोग्य मालाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे. हिवाळ्याचा मुख्य हंगाम असूनही गुणवत्तापूर्ण भाज्या अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळेच बाजारात दर वाढीचा ताण निर्माण झाला आहे. याशिवाय, मार्गशीर्ष महिन्यात अनेक घरांमध्ये मांसाहार टाळत शकहाराचा अवलंब केला जात असल्याने नेहमीपेक्षा जास्त भाज्या खाल्ल्या जातात. परिणामी, सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचा खर्च वाढला आहे.
घाऊक भाजीपाला बाजारात फ्लॉवर 16 ते 20 रु. किलो, कोबी 14 ते 20 रु. किलो, गवार 70 ते 90 रु. किलो, फरसबी 30 ते 36 रु. किलो, तोंडली 40 ते 50 रु. किलो, वालवड 50 ते 60 रु. किलो, भेंडी 55 ते 65 रु. किलो, ढोबळी मिरची 50 ते 70 रु. किलो तर टोमॅटो 35 ते 45 रु.ये किलोला विकला जात होता. किरकोळ बाजारात हे दर साधारण 20 ते 30 टक्क्यांनी अधिक आकारले जात आहेत. चांगल्या प्रतीच्या भाज्यांवर ग्राहकांचा भर असल्याने त्या आणखी महागल्या आहेत.






