स्थानिक गुन्हे शाखेकडून अड्डा उध्वस्त
। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यात अवैध गावठी दारू निर्मितीवर आळा बसवण्यासाठी रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व गोपिनय विभागाचे तडवी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त माध्यमातून सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. तळाघर येथील गाईन जंगल परिसरात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीचा अड्डा पोलिसांनी कौशल्यपूर्ण सापळा रचून उध्वस्त केला. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे काशीनाथ सखाराम पुजारी (वय 40, रा. निवी ठाकुरवाडी) हा जंगल भागात मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टी चालवत असल्याचे समोर आले. याबाबत तात्काळ पथकाने छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी विक्रीसाठी तयार केलेला अवैध माल नष्ट केला. यात ५ लोखंडी टाक्या, 2 टाकीचे ड्रम (अंदाजे 30 लिटर क्षमतेचे), गुळ व साखर मिश्रित रसायन (60 रुपये प्रतिलिटर), 40 लिटर गावठी दारू (100 रुपये प्रतिलिटर), दारू साठवण्यासाठी वापरलेली रबरी ट्यूब (किंमत 4 हजार रुपये) असा एकूण 1 लाख 30 हजार किमतीचा अवैध माल होता.
याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर या धडक कारवाईत पीएसआय अविनाश पाटील, पोलीस हवालदार श्यामराव कराडे, लालासाहेब वाघमोडे, पोलीस शिपाई मोरेश्वर ओमले, बाबासो पिंगळे, ओंकार सोनकर हे अधिकारी उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे रोहा तालुक्यातील अवैध दारूविरोधातील मोहीम आणखी तीव्र होणार असल्याची माहिती मिळत आहे.







