| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
भारतीय संविधान दिनाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्या दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक कामाची जाण व्हावी, त्यांना मेहनत करण्याची सवय लागावी यासाठी पिटसई येथील अशोक ल. लोखंडे विद्यालयात सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या श्रमातून शेनाटे आदिवासी वाडी येथे नदीच्या वाहत्या पाण्यावर दगडी बंधारा बांधला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण खुळपे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा दगडी बंधारा बांधण्यात येऊन श्रमदानाचे एक उत्तम व सफल कार्य यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. या नदीवर बंधारा बांधून लोकांना जाण्या-येण्याचा मार्गसुद्धा बनवला आहे. समाजसेवा उपक्रमांतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या घरातील कोयते, पारय, घमेले, फावडे हे साहित्य आणावयास सांगून शालेय परिसर स्वच्छ केला. वाढलेली झाडे झुडपे नष्ट करणे, मातीचा भराव टाकणे, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे झुडपे कोयत्याच्या साह्याने कापण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत या शाळेचे चेअरमन खेळू वाजे व सचिव संजय रेडीज स्वतः सहभागी होऊन मुलांचा उत्साह वाढवला आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते गणेश बामणे आणि नगरसेविका ग्रीष्मा बामणे यांच्यातर्फे विद्यालयातील 300 विद्यार्थ्यांना पावभाजीचा अल्पोहार देण्यात आला. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष खेळूशेठ वाजे, सचिव संजय रेडीज व विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण खुळपे यांच्यातर्फे आभार मानण्यात आले. यावेळी संविधान वाचनसुद्धा करण्यात आले. असंख्य विद्यार्थ्यांना संविधानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक अकिल मुलाणी, संजय ठमके, सुखदेव सवई सर्जे, भागिनाथ बांगर, संदीप इंगवले, सुनील तेलंगे, एकनाथ कोळी, रेखा रेडीज ,नीलम गोळे, मुख्य लिपिक दीपक भोसले उपस्थित होते.







