आर.एस. पाटील यांना भाई जयंत पाटील यांची आदरांजली
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात सहकार चळवळीतील दिशादर्शक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते दिवंगत आर.एस. पाटील यांच्या निधनाने सहकार क्षेत्रास मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन व्यक्त करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष भाई जयंत पाटील यांनी गोरठण येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी बोलताना भाई जयंत पाटील म्हणाले की, “आर.एस. पाटील हे माझे सहकार क्षेत्रातील खरे मार्गदर्शक होते. त्यांच्या समर्पणशील कार्यामुळे अनेक उपक्रमांना दिशा मिळाली. पक्षासाठी आणि सहकार क्षेत्रासाठी त्यांनी दिलेलं अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील.” दिवंगत पाटील यांच्या पश्चात सुधीर पाटील, मोहन पाटील, सचिन पाटील, अशोक पाटील आणि अनंता पाटील यांनी त्यांची परंपरा आणि कार्य पुढे न्यावी, अशी आशा व्यक्त करत “कुटुंबियांनी त्यांचा आदर्श पुढे नेणे हीच खरी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल,” असे प्रतिपादन भाई जयंत पाटील यांनी केले. या सांत्वनपर भेटीवेळी शेकापचे खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, खोपोली शिळफाटा व्यापारी असोसिएशनचे राजेश अभाणी, जयंत पाठक तसेच इतर मान्यवरांनीही श्रद्धांजली वाहिली.







