पालिकेच्या ठेकेदाराकडून कचरा उचलण्यात दिरंगाई
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कचरा उचलण्यासाठी ठेकेदार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे 975 कारखान्यांना फटका बसत आहे. पीएमसी कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे तळोजा एमआयडीसीमधील उद्योग त्रस्त झाले असून, यावर तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
येथील उद्योगांकडून पीएमसीला मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर भरला जात असूनही मूलभूत नागरिक सुविधा विशेषता दररोजचा कचरा संकलन पूर्णपणे दुर्लक्षित होत आहे. टीआयएनने याबाबत पीएमसीला वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतेही सुधारणा झालेली नाही. पूर्वी टीआयए सदस्य, पीएमसीचे वरिष्ठ स्वच्छता अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यासह एक संयुक्त ग्रुप तयार करण्यात आला होता. मात्र, या गटातही हे स्पष्ट झाले आहे की कचरा केवळ उद्योगांनी वारंवार मागणी केल्यावरच उचलला जातो. नियमित आणि प्रणालीबद्ध महानगरपालिका सेवेसारखा नाही. टी आय एनने या कामकाजाची पद्धत अव्यसायिक, निष्काळजी आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे.
राज्य सरकार उद्योगांना पाठिंबा देत असताना पीएमसी मात्र अडथळे निर्माण करत आहे. येथील उद्योग पीएमसीच्या कार्यप्रणालीमुळे त्रस्त झाले आहेत. एमआयडीसीतील कचरा संकलन वेळेत होत नाही, त्यामुळे कचरा कंपनीच्या गेटवर किंवा आत मध्ये पडून राहतो. या कचऱ्यातून तीव्र दुर्गंधी निर्माण होते याचा त्रास कारखानदार व कामगारांना होतो.
पालिका आयुक्तांकडे टीआयएची मागणी
कचरा कंत्राटदाराला देय असलेली रक्कम तत्काळ थांबवावी. तळोजा औद्योगिक पट्ट्यात दररोज कचरा संकलन सुनिश्चित करणारा सक्षम व विश्वसनीय नवीन कंत्राटदार नेमावा. पीएमसीने न दिलेल्या सेवांच्या बदल्यात उद्योगांकडून घेण्यात आलेल्या कराची प्रमाणानुसार रक्कम परत करावी.
तळोजातील कारखानदारांना कचऱ्याची समस्या भेडसावत असून, ठेकेदार वेळेत कचरा उचलत नाही. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. निष्काळजीपणा करणारे ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी.
सतीश शेट्टी,
अध्यक्ष, टीआयए





