| राबगाव/पाली | प्रतिनिधी |
भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पातळीवर वेगाने वाढत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही या प्रवाहात सहभागी होणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी वैज्ञानिक म्हणून पुढे आल्यास देशाचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा गीता पालरे यांनी केले. शिक्षण विभाग पंचायत समिती सुधागड पाली, विज्ञान-गणित अध्यापक मंडळ, सुधागड व सु.ए.सो.चे ग.बा.वडेर हायस्कूल व वसंतराव गणेशमल ओसवाल ज्युनियर कॉलेज पाली यांच्या संयुक्त विद्यमाने 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2025-26 चे दि. 1 व 2 डिसेंबर रोजी सु.ए.सो.चे ग.बा. वडेर हायसकूल व वसंतराव गणेशमल ओसवाल ज्युनियर कॉलेज पाली येथे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनांप्रसंगी त्या बोलत होत्या. या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात 29 तर माध्यमिक गटात 17, शिक्षक प्राथमिक गट 3 माध्यमिक गट 3 उपकरणांची मांडणी करण्यात आली असून पहिल्याच दिवशी 700 ते 800 विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शन पाहण्यासाठी सहभाग नोंदविला. दरम्यान, सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेपासून लांब राहून विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. सदर विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख (सर्व), माध्यमिक मुख्याध्यापक (सर्व), प्राथमिक शिक्षक संघटना (सर्व), विषयसाधनव्यक्ती (सर्व), शिक्षण विभाग पाली सुधागड उपस्थित होते.







