नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज; 1 हजार 551 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई
| रायगड | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक हजार 551 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गावांमध्ये गुन्हेगारीच्या बळावर दहशत पसरविणाऱ्यांना दणका दिला आहे. त्यांना चांगल्या वर्तणूकीची तंबी देत चांगल्या वागणुकीचे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले आहे. या गावगुंडाणा पोलिसांनी दणका दिल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, श्रीवर्धन, मुरूड-जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत, माथेरान या दहा नगरपरिषदेच्या निवडणूकीचे मतदान दोन डिसेंबरला होणार आहे. ही प्रक्रीया शांततेत पार पाडावी. नागरिकांना निर्भीडपणे मतदान करता, यावे यासाठी रायगड पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज झाले आहेत. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस कामाला लागले आहेत. निवडणूक प्रक्रीया सुरळीत व शांततेत होण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरु केले आहे.
नगरपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने रायगड पोलीस दलाने महिन्याभरापासून तयारी सुरु केली आहे. वेगवेगळ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले आहे. ही प्रक्रीया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यााठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मतदारांवर वेगवेगळ्या पध्दतीने दबाव टाकणारे, सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई देखील सुरु केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील एक हजार 551 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता या कलमांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून निवडणूकीच्या कालावधीत दारु निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. 93 जणांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे .
हजारो पोलिसांची राहणार नजर
जिल्ह्यातील दहा नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मतदान दोन डिसेंबरला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी कोणताही गैरप्रकार घडू नये, म्हणून 1 हजार 341 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे. त्यात 400 होमगार्ड जवान, 69 पोलीस अधिकारी, 872 पोलीस अंमलदारांचा समावेश असणार आहे.
तडीपारसह शस्त्रसाठा जप्त
नगरपरिषद निवडणूकीत काही गैरप्रकार व दुखापत होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. गावांमध्ये गुंडगिरी करणाऱ्यांसह अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुंडाना चपराक बसवली आहे. एकूण सहा जणांना हद्दपार करण्यात आले असून एक हजार 1198 जणांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.







