वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर?
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये 2016-17च्या निवडणुकीनंतर तब्बल 5 हजार मतदार वाढले आहेत. त्यामुळे वाढलेले मतदार आणि प्रत्यक्ष झालेले अधिकचे मतदान यांचा फायदा कोणत्या राजकीय पक्षांना होणार, याची गोळाबेरीज करण्यात माथेरानकर गुंतले आहेत. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही मतांची असलेली पिछाडी महायुती भरून काढणार का? तसेच, माथेरान नागरी पतसंस्थेच्या निवडणुकीत एकत्र आलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट तसेच या पक्षांचे शिवराष्ट्र पॅनल माथेरान नागरी पतसंस्थेनंतर माथेरान नगरपरिषद जिंकणार का? याकडे माथेरानकरांचे आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे.
माथेरानमध्ये 2016-17 मध्ये शिवसेना पक्षाने घवघवीत यश मिळावित नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या 14 जागा आणि थेट नगराध्यक्ष अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर 5 वर्षांनी होणारी सार्वत्रिक निवडणूक 8 वर्षे उलटले तरी पार पडली नव्हती. अखेर मंगळवारी (दि.2) माथेरानसह जिल्ह्यातील इतर नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत माथेरानमध्ये चक्क 85 टक्के हुन अधिक मतदान झाले आहे. तत्पुर्वी, अंदाजे 80 टक्के पर्यंत मतदान होईल, असे गृहीत धरले जात होते. 2016-17 नंतर होणाऱ्या निवडणुकीत तब्बल 5 हजाराच्या आसपास मतदार वाढले आहेत. त्यामुळे वाढलेले हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, हे 21 डिसेंबर रोजी कळणार आहे. दरम्यान, प्रचारामध्ये माथेरान शहराच्या प्राथमिक गरजा आणि पयर्टकांसाठी उत्तम सोयीसुविधांचे स्वप्न मतदारांना महायुती आणि शिवराष्ट्र पॅनलकडून दाखवण्यात आले. पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानसाठी पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची समस्या महत्वाची समजली जाते. त्याचवेळी पर्यायी मार्ग, फिनिक्युलर रेल्वे, रोपवे, प्रेक्षणीय स्थळांचा पर्यावरण पूरक विकास, तसेच येथील ई-रिक्षा आणि घोड्यांचे प्रश्न यावर येथील निवडणुकीच्या रिगणनात उतरलेल्या दोन्ही बाजूंनी आश्वासने देण्यात आली. मतदारांना प्रलोभने दाखवताना राज्याचे पर्यटन मंत्र्यांनी माथेरानच्या विकासाचा रोडमॅप तयार करून दरवर्षाला आढावा घेतला जाईल, असे आश्वासन दिले गेले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माथेरानची ओळख असलेली चिक्की आणि चामड्याच्या वस्तूंना पेटंट म्हणून विकसित करून बचत गटांच्या माध्यमातून या दोन क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन दिले गेले. या सर्व आश्वासने आणि नंतर एम फॅक्टर ने मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत बजावलेली भूमिका यामुळे मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे दिसून आले.
पतसंस्थेचा निकाल कायम राहणार?
माथेरान नगरपरिषदेच्या निवडणुकीला 6 महिने आधी माथेरान नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक होते. माथेरान हे श्रमिकांचे गाव असल्याने या गावातील बहुसंख्य नागरिक हे या पतसंस्थेचे खातेदार आहेत. त्यांचे मतदान असलेलीच माथेरान नागरी पतसंस्थेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवराष्ट्र पॅनलने जिंकली आहे. या निवडणुकीचे निकाल माथेरान नगरपरिषदेत जाण्याची पायरी समजली जाते. मात्र, पराभव झाल्यानंतर पालिका निवडणुकीसाठी माथेरानमधील शिवसेना आणि भाजपने नियोनबद्ध तयारी केली होती. त्यामुळे माथेरान नागरी पतसंस्थेचा निकाल यावेळी देखील कायम राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदानाची गोळाबेरीज आदारांना वरचढ
विधानसभा निवडणुकीत माथेरान शहरातील चार प्रभागात शिवसेना-भाजप युतीला 1,324 मते मिळाली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवाराला 1,351 आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला 245 मते मिळाली होती. या पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांचे शिवराष्ट्र पॅनल असल्याने त्यांच्या विधानसभा निवडणुकीतील मतांची गोळाबेरीज केली तर ती 1,596 इतकी होती. त्यामुळे हि संख्या आमदार महेंद्र थोरवे यांना पडलेल्या मतांपेक्षा पावणे तीनशेने अधिक आहे. त्यामुळे शिवराष्ट्र पॅनल बाजी मारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







