प्रशासन मात्र अनभिज्ञ
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात मंगळवारी सकाळी हेलिकॉप्टर आल्याचे दिसून आले. त्या हेलिकॉप्टरबद्दल तालुक्यातील प्रशासनाला कोणतीही माहिती नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, असे हेलिकॉप्टर तालुक्यात सातत्याने हवाई फेऱ्या मारत असून, हे हेलिकॉप्टर नक्की कोणाचे? असा प्रश्न सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत. दरम्यान, प्रशासन काय करते? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला असून, हवाईमार्गे येऊन काही अनुचित प्रकार केल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईच्या जवळ असलेल्या कर्जत तालुक्यातील जमिनीकडे देशभरातील उद्योजकांचे लक्ष लागले आहे. नवनवीन प्रकल्प आणून कर्जतच्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा डोळा गुंतवणूकदारांचा आहे. म्हणूनच उद्योजक कर्जतमध्ये येण्यासाठी हेलिकॉप्टर वापरत असल्याचे आढळून येत आहे. मात्र, हे हेलिकॉप्टर कर्जत तालुक्याच्या हवाई हद्दीत उतरत असताना त्याची नोंद कर्जत तालुका प्रशासनाला असावी, अशी एक साधी अपेक्षा आहे. मात्र, खासगी हेलिपॅडवर उतरणाऱ्या उद्योगपतींची संख्या वाढली असून, देशातील पहिल्या क्रमांकाचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मागील काही महिन्यातील हेलिकॉप्टर फेऱ्या विशेष चर्चेत होत्या. पण, कर्जत तालुक्यातील खासगी हेलिपॅडवर उतरणाऱ्या हेलिकॉप्टर यांची संख्या मागील काही महिन्यात वाढली आहे.
तालुक्यात सरकारी हेलिपॅड कुठेही नाही आणि त्यामुळे निवडणुकीच्या काळात किंवा शासकीय कार्यक्रमांच्या सोहळ्यासाठी येणारी नेतेमंडळी टाटा कंपनीच्या हेलिपॅडवर उतरतात.तर, दुसरीकडे कर्जत तालुका हद्दीला लागून असलेल्या वावरले येथील सॉल्ट हॉटेल येथील हेलिपॅडवर येणाऱ्या व्हीव्हीआयपींची संख्य वाढली आहे. मात्र, हे दोन्ही हेलिपॅड खासगी असल्याने प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. फक्त मंत्री आणि नेतेमंडळी यांच्या कर्जत तालुका दौरा यावेळी तालुका प्रशासन सक्रीय असल्याचे दिसून येत असते. मात्र, सध्या कर्जत तालुक्यात काही खासगी हेलिपॅड उभारण्याचे प्रकार वाढले आहेत. त्या हेलिपॅडवर उतरणारे व्हीव्हीआयपी किंवा उद्योगपती यांच्याबद्दल कोणतीही नोंद प्रशासन यांच्याकडे नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांदेखील आकाशात घिरट्या घेणारे हेलिकॉप्टर दररोज बघण्याशिवाय काही हाती उरले नाही. कारण, त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे कोण? याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही. त्यामुळे ही माहिती सर्वसामान्य लोकांना असण्याचे कोणतेही कारण नाही.
सरकारी हेलिपॅड कधी होणार?
कर्जत तालुक्यात सरकारी हेलिपॅड असावा यासाठी असलेले शासनाच्या धोरणानुसार हेलिपॅड उभारले जाणार आहे. कर्जत तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या कडाव येथे हेलिपॅड बांधण्यात यावे यासाठी कडाव ग्रामपंचायतने अडीच एकर जमीन शासनाला दिली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या तीन वर्षात तेथे कोणत्याही प्रकारचे काम केले नाही. शासनाचे हेलिपॅड असते, तर त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती सरकारकडे, कर्जत तालुका प्रशासनाकडे राहिली असती.






