पाच तरुणांना अडकवले लग्नाच्या फेऱ्यात
| उरण | प्रतिनिधी |
उरण-पनवेल परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना प्रेमाच्या सापळ्यात ओढून त्यांच्या आयुष्याशी उद्ध्वस्त खेळ करणाऱ्या एका महिलेचा हनीट्रॅप रॅकेट अखेर उघडकीस आले आहे. लहान मुलीसह उरण परिसरात राहणारी ही महिला, चांगल्या घरातील, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या तरुणांना इन्स्टाग्राम व फेसबुकवरून ओळख करून प्रेमाच्या नात्यात बांधते आणि नंतर पद्धतशीररित्या आर्थिक, मानसिक व कायदेशीर शोषण सुरू करते, अशी धक्कादायक माहिती तक्रारदारांकडून समोर आली आहे.
या महिलेने आजपर्यंत किमान पाच तरुणांशी विधीनुसार लग्न केल्याचे गंभीर उघड झाले आहे. प्रेमाच्या नावाखाली तरुणांना राज्याबाहेर फिरायला नेले जाते, विश्वास संपादन केला जातो आणि नंतर उरण येथीलच तिच्या राहत्या घरात विधीवत हार घालून लग्नाची नाटकी प्रक्रिया केली जाते. या सर्व ‘लग्नांसाठी’ ही महिला पेण तालुक्यातील एकाच भटजीला वारंवार बोलावते, अशी माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
या सर्व हनीट्रॅप रॅकेटमध्ये महिलेबरोबरच तिचा भाऊ आणि एक तरुण मित्र सक्रिय भूमिका बजावत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. प्रेमाच्या नात्यात विश्वास बसल्यानंतर ही महिला तरुणांकडून लाखो रुपयांची खंडणी उकळण्यास सुरुवात करते. खंडणी न दिल्यास, ती स्वतःवर बलात्काराची खोटी तक्रार, तसेच स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचे आरोप पोलिसांकडे दाखल करण्याची धमकी देत तरुणांना ब्लॅकमेल करते.
आता उघडकीस आलेल्या माहितीनुसार, ही महिला यापूर्वीही उलवे पोलीस ठाण्यात अनेक वेळा खोट्या तक्रारी दाखल करत आली आहे, आणि त्या मागे घेण्यासाठी पीडितांकडून पैसे उकळण्यात आले आहेत. तिच्या वागणुकीची भीती दाखवण्यासाठी ती आपले नातेवाईक वकील असल्याचे सांगत, कायदेशीर कारवाईची धमकी देत तरुणांना कोपऱ्यात पकडत असल्याची तक्रार आहे. तक्रारदारांनी या संपूर्ण प्रकरणाचा स्टिंग ऑपरेशन करून ऑडिओ-व्हिडिओसह महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, हे सर्व पुरावे उलवे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. या प्रकरणात आणखी काही तरुण बळी पडले असण्याची प्रबळ शक्यता असून, या हनीट्रॅप टोळीमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
तक्रारदारांनी आवाहन केले आहे की, एखाद्याला अशाच प्रकारच्या फसवणुकीचा अनुभव आला असेल किंवा कोणी या हनीट्रॅपच्या जाळ्यात सापडत असेल, तर न घाबरता पोलिसांकडे तक्रार करा. या संपूर्ण प्रकरणाचा लवकरच मोठ्या पर्दाफाश होणार असून, महिलेचे सर्व कारनामे आणि उपलब्ध पुरावे जनतेसमोर आणले जाणार असल्याचे तक्रारदारांनी स्पष्ट केले.






