शिंदे गट चवताळला, रस्त्यावर तमाशा केला
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी आ. महेंद्र दळवी यांचा पैशांच्या गठ्ठ्यासोबत शेअर केलेल्या कथित व्हिडिओमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी नोटांच्या ढिगाऱ्यासोबत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अंबादास दानवे यांनी टाकलेल्या व्हिडीओ बॉम्बने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.
दरम्यान, अलिबाग तालुक्यातील शिंदे गट चांगलाच चवताळला असून, हे आरोप फेटाळून लावत आमदारांच्या पत्नीसह त्यांच्या बगलगच्च्यांनी रस्त्यावर निषेधाचा तमाशा केला. यावेळी दानवेंचे फोटो जाळून त्यांच्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी टीका केली. यावर दानवे यांनी व्हिडीओची शहानिशा पोलिसांनीच करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेचे पडसाद अधिवेशनातही उमटले. तर, सत्ताधारी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा हा कथित व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला. या व्हिडीओत नोटांचे बंडल दिसत आहेत. दानवे यांनी आरोप केल्यानंतर दळवींनी सुनील तटकरेंवर निशाणा साधला. तटकरे यांच्यावर मी आरोप केले होते. त्या रागातून त्यांनी हा व्हिडीओ दिला असावा, असा दावा महेंद्र दळवी यांनी केला आहे. सुनील तटकरे यांनीच हे सर्व केलं, असा थेट आरोपही दळवींनी केला आहे.
अलिबागची अस्मिता पणाला
आजपर्यंत रायगड जिल्ह्यात समाजकारणाचे राजकारण झाले. अलिबागला एक वेगळा इतिहास आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत अनेक दिग्गज होऊन गेले. आजही अलिबागचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचविण्यात अनेकांचे योगदान आहे. पर्यटनदृष्ट्या हे शहर विकसित होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा तसेच राजकीय क्षेत्रात नाव कमावलेल्या अलिबागला दळवींच्या या कृत्यामुळे डाग लागला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. या कथित व्हिडिओमुळे अलिबागची अस्मिता पणाला लागली असल्याचीही चर्चा जोर धरीत आहे.
वादग्रस्त दळवी
अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरलेले अलिबाग मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सातही मतदारसंघांतील आमदारांमध्ये ते याबाबत आघाडीवर आहेत. घरगुती हिंसाचार, चोरी, मारामारी, जमीन हडप करणे, यासंदर्भात अलिबाग पोलीस ठाण्यात 2010 पासून दळवींविरोधात गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यांबाबतची माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
ही आहेत कलमे
घरगुती हिंसाचार कायदा कलम 12, 18, 19, 19, 2, 20 भारतीय दंड संहितेचे कलम 379, जमीन महसूल कायदा 167, 182 भारतीय दंड संहितेचे कलम 324, 143, 147, 148, 427, 323, 504, 506, मु. पो. ॲक्ट 371, 3, 135 ॲट्रॉसिटी ॲक्ट 31, 10, 6.
पैशांचे बंडल अन् शिंदेंचा आमदार
नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मंगळवारी हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपण्याआधीच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या ट्वीटने खळबळ उडाली. अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा एक धक्कादायक व्हिडिओ ट्वीट केला. ज्यामध्ये ते पैशांच्या बंडलांसोबत दिसत आहेत.
काय आहे अंबादास दानवे यांचे ट्वीट?
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल करत ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. व्हिडिओमध्ये शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरोडा प्रकरणात हात?
अलिबाग तालुक्यात दरोडा टाकून दीड कोटींचा मुद्देमाल लुटल्याची घटना फेबु्रवारीमध्ये घडली होती. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यामध्ये आमदारांचे सुरक्षा रक्षक तसेच घरकाम करणाऱ्यांसह अन्य दोघांना म्हणजेच एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक करुन मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात स्थानिक आमदारांचे लागेबांधे असल्याच्या चर्चेनंतर आता आमदारसाहेबांचे गुन्हेगारांना आशीर्वाद देतानाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. लोकप्रतिनिधीच गुन्हेगारांना पोसण्याचे काम करीत असल्यामुळे सध्या रायगड जिल्ह्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.






