वाहतूक कोंडीला आळा; चाकरमान्यांसह पालीकरांचा प्रवास सुरळीत
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, तसेच पाली शहरातील वाढती वाहनांची गर्दी नियंत्रणात राहावी, यासाठी पाली पोलिसांनी यंदा चोख नियोजन करत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली. गणपती सणाच्या काळात शहरात सतत वाढणारी गर्दी आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन पोलिसांनी प्रमुख चौकांसह संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्त तैनात केला.
पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सव काळात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडली. शहरातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणाकडे मार्गस्थ होत असल्याने वाहनांची संख्या वाढते. त्याचबरोबर बाजारपेठेतील नागरिकांची वर्दळ, स्थानिक वाहने आणि गणेशोत्सवासाठी होणारी गर्दी यामुळे वाहतुकीवर मोठा ताण येतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी आधीपासूनच नियोजन केले होते. शहरातील प्रमुख चौक, वर्दळीचे मार्ग आणि वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले. वाहनांना योग्य दिशा देणे, गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करणे, वाहनांची कोंडी होऊ न देणे तसेच गरज भासल्यास तातडीने हस्तक्षेप करणे, यावर पोलिसांनी विशेष भर दिला.
गणेशोत्सवाच्या काळात पाली शहरात नागरिकांची आणि वाहनांची सतत वर्दळ असतानाही पोलिसांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात नियंत्रणात राहिला. त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसह स्थानिक पालीकरांनाही दिलासा मिळाला. गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा सण असल्याने नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पाली पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. वाहतूक नियंत्रणासोबतच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही पोलिसांनी सतर्कता कायम ठेवली. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची वाढती संख्या आणि गर्दीमुळे पाली शहरातील वाहतूक व्यवस्थेची परीक्षा होत असते. यंदा मात्र पोलिसांच्या पूर्वनियोजनामुळे वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणात आळा बसला.





