भाजप समर्थकांवर गुन्हा दाखल
| उरण | प्रतिनिधी |
उरणमध्ये मनसे पदाधिकारी सतीश बिपीन पाटील आणि त्यांच्या आईवर करण्यात आलेला हल्ला हा राजकीय सूडबुद्धीचा स्पष्ट नमुना असून, भाजप समर्थकांच्या दहशतवादी राजकारणाचा आणखी एक पराकाष्ठा आहे. नगरपरिषद निवडणुकीत भाजपविरोधात प्रचार करण्याचे ‘धाडस’ दाखवल्याचा बदला म्हणून पाटील आणि त्यांच्या आईला दत्तजयंतीच्या दिवशी रस्त्यात अडवून शिवीगाळ, मारहाण आणि सरळ जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या प्रकारामुळे उरणमध्ये संतापाचे वादळ उसळले आहे. दर्शन करून घरी जात असताना पाटील यांना रस्त्यात अडवून केलेला हा हल्ला हा केवळ व्यक्तीवरचा प्रहार नव्हता, तर मनसे कार्यकर्त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा उघड प्रयत्न होता.
मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी पाटील यांना जबरदस्तीने आमदारांच्या बंगल्यासमोर नेऊन माफी मागण्यास भाग पाडले आणि त्या संपूर्ण अपमानास्पद प्रसंगाचे व्हिडिओ शूट करून राजकीय दादागिरीची पराकाष्ठा गाठली. या गुंडगिरीत सहभागी असलेले गणेश पाटील, कौशिक शहा, निलेश पाटील, संजोग गांधी, सनी भोईर, विशाल पाटेकर, अमन शर्मा, गणेश सुतार, महेश लाड, रोहन गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची सूत्रे उपनिरीक्षक सतीश गोरे यांच्या हाती देण्यात आली आहेत.
घटनेवर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीच्या नेत्या भावना घाणेकर यांनी उरण बिहारच्या दिशेने चालले आहे. अशा दहशतवादी राजकारणाला जनता योग्य उत्तर देईल, असा संतप्त स्वर लावला. तर महाविकास आघाडीचे नेते मनोहर भोईर यांनी निवडणुकीनंतर असा सूड उगवणं ही उरणच्या संस्कृतीला काळिमा फासणारी बाब असल्याचे सांगत या कृत्याचा निषेध केला. दत्तजयंतीसारख्या धार्मिक यात्रेच्या दिवशीच उरणमध्ये केलेल्या या राजकीय सूड प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट पसरली असून, नागरिकांनी अशा दहशतीला चोख उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.







