| माणगाव | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानाच्या चौकटीत न ठेवता, महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास, संस्कृती आणि स्वराज्याचे महत्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकविण्याचा उपक्रम आरंभ अकॅडमी श्री क्लासेस, इंदापूर सातत्याने राबवत आहे. गेल्यावर्षी किल्ले रायगडावरील उपक्रमानंतर, यंदा संस्थापक श्रीकांत खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली 6 वी ते 10 वी तील 86 विद्यार्थी प्रतापगडाच्या साक्षीने जिवंत इतिहासाशी जोडले गेले. प्रतापगडाचे ऐतिहासिक वैभव अनुभवताना विद्यार्थ्यांनी ‘दुर्ग संवर्धन हेच ध्येय’ हा वसा घेत गड परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमातून त्यांना केवळ पर्यावरण संवर्धनाची जाणीवच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी, जबाबदारी आणि सामूहिक कार्याची शिकवणही मिळाली. शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांसमोर इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाचा जिवंत अभ्यास तर झाला, पण त्याचबरोबर आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी मनोमन स्वीकारली. संस्थापक श्रीकांत खताळ यांनी सांगितले, ”या सहलीतून विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली.
शिवकालीन खेडी आणि जीवनशैली: स्वराज्य उभारणीत सामान्य जनतेचे योगदान विद्यार्थ्यांसमोर उलगडले. स्वराज्य निर्मितीचा प्रवास: छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत उभे केलेले स्वराज्य याची प्रेरणादायी माहिती देण्यात आली. प्रतापगडाचा थरार: अफजलखान वधाची घटना आणि प्रतापगडाचे सामरिक महत्त्व विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने ऐकले. गडदर्शन: भवानी माता मंदिर, समाधी, बुरुज, युद्धनीतीशी संबंधित ठिकाणे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आली.







