त्रिकुटाविरोधात पोलिसांत गुन्हा
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलमधील त्रिकुटाने चेरवली येथील 60 गुंठे जमीन विक्री करण्याच्या बहाण्याने कोपरखैरणेती रमेश वेटा (69) या मजूर ठेकेदाराला 92 लाख 73 हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भीमराव राठोड, वासुदेव लाड व बाळाराम लाड अशी त्रिकुटाची नावे असून, पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रमेश वेटा यांची नोव्हेंबर 2011मध्ये भीमराव राठोड याच्याशी ओळख झाली होती. दरम्यान, राठोड याने त्याच्या मालकीची चेरवली येथे 60 गुंठे जमीन असल्याचे सांगून ती प्रती गुंठा 1 लाख रुपयांप्रमाणे 60 लाख रुपयांमध्ये विकत घेण्यास सांगितले होते. त्या वेळी राठोड याने खोटे व बनावट सातबारा उतारे दाखवून जमीन त्याच्या नावावर असल्याचे भासवले होते. त्यामुळे रमेश वेटा यांनी जमीन खरेदीसाठी राठोड याला पैसे देण्यास सुरुवात केली.
मार्च 2012मध्ये पनवेल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात या जमीन खरेदी-विक्री व्यवहाराची नोंदणीही करण्यात आली. एवढेच नव्हेतर राठोड याने 2012चे बनावट सातबारा दाखले ही रमेश वेटा यांना सादर केले. त्यामुळे त्यांनी राठोड याला 53 लाख 80 हजार रुपयांची रक्कम धनादेशद्वारे दिली. मात्र, मे 2012मध्ये ही जमीन राठोड यांच्या नावावर नसून त्याचे मूळ मालक वासुदेव आणि बाळाराम विठ्ठल लाड हे दोघे असल्याचे वेटा यांना समजले. त्यानंतर लाड यांनीदेखील त्यांच्या नावे असलेल्या जमीन व्यवहारात अडथळा निर्माण करणार नसल्याचे सांगून वेटा यांच्याकडे 20 लाखांची मागणी केली. त्यावर वेटा यांनी दबावाखाली रोख व चेकद्वारे लाड यांना 20 लाख रुपये दिले. त्यानंतर या तिघांनी संगनमत करून रमेश वेटा यांच्या नावावर जमीन न करता जून 2014 मध्ये राठोड यांच्या नावावर करून घेतली. त्यानंतर जमीन किंवा पैसे देण्यास टाळाटाळ करू लागल्याने अखेर वेटा यांनी या तिघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.







