पोलीस पाटलांची बनावट नावे टाकून बिल काढण्याचा प्रताप; चौघांविरोधात गुन्हा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पोलीस पाटील यांची बनावट नावे टाकून मानधनाच्या बिलात फेरफार करण्याचा प्रताप समोर आला आहे. यामध्ये पावणे दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखेतील कनिष्ठ लिपिकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड जिल्हा परिषदेतील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारानंतर आता पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखा विभागातील लिपिकाकडून भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश राम जाधव हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखा विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 2021 पासून ते आजतागायत जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची यादी बनवून त्यामध्ये प्रत्यक्ष हजर नसलेल्या पोलीस पाटलांची बनावट नावे टाकून बनावट देयक तयार केले. त्यानंतर पोलीस पाटील यांची दरमहा मानधनाची मंजुरी कोषागारातून प्राप्त करून घेतली. त्यानंतर पुन्हा या यादीमध्ये फेरफार करून दुसरी बनावट यादी तयार करून स्वतःच्या नावे 72 लाख 32 हजार 500 रुपये, तसेच रिया राजेश जाधव या पोलीस पाटील नसताना त्यांच्या नावाचा मुदतवाढीचा खोटा दाखला बनवून त्यांच्या नावाने एक कोटी पाच लाख 96 हजार रुपयांची रक्कम कोषागारातून काढली. एकूण एक कोटी 78 लाख 29 हजार 300 रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
स्वतःच्या व इतर अशासकीय व्यक्तींच्या बँक खात्यात घेऊन शासकीय रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला. इतर काही पोलीस पाटील यांच्या नावे दुबारपेक्षा अधिक वेळा त्यांच्या खात्यावर मानधनाची रक्कम टाकण्यात आली आहे. याप्रकरणी राजेश जाधव, रिया जाधव व इतर दोन अशा एकूण चौघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







