महावितरण कंपनीत होणार नियमित?; औद्योगिक न्यायालयाचा निर्णय
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महावितरण कंपनीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांनी लढा पुकारला होता. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे. या कर्मचाऱ्यांना औद्योगिक न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना नियमित करण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी आता नियमित होण्याच्या वाटेवर आहेत.
महावितरण कंपनीमध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यामध्ये दोन हजार 274 हून अधिक कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यात रायगड जिल्ह्यात 64 हून अधिक कर्मचारी आहेत. हे कर्मचारी बाह्यस्त्रोत विभागात कार्यरत आहे. विद्युत खांबावर चढणे, तारा बदलणे, वीजपुरवठा सुरळीत करणे, वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना आवाहन करणे, अशी अनेक प्रकारची कामे करतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे, यासाठी ते गेल्या 13 वर्षांपासून लढा देत होते. मुंबईतील महावितरण कार्यालयाबरोबरच आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्यात आले होते. अखेर न्यायासाठी औद्योगिक न्यायालयात धाव घेण्यात आली. ॲड. गायकवाड आणि ॲड. स्मिता पाराठकर यांनी न्यायालयासमोर योग्य बाजू मांडली. केलेला युक्तीवाद सादर, केलेले पुरावे ग्राह्य धरून औद्योगिक न्यायालयाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नोकरीत लागल्यापासून 240 दिवस पूर्ण झालेल्या दिवसांपासून वेतनश्रेणी, पगार फरक लागू, पदोन्नती हा आदेश महावितरणने सहा महिन्यात अंमलात आणावा, अंमलबजावणी न झाल्यास 28 सप्टेंबर 2012 पासून देणी प्रलंबित राहिलेल्या रकमेस वार्षिक पाच टक्के व्याज आकारणीचे आदेश दिले आहेत. राज्यासह रायगड जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.
महावितरण कंपनीमध्ये 2006 पासून कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होतो. कायम करण्यासाठी 2011 पासून आंदोलन सुरु केले. 2012 मध्ये मुंबईत लढा देण्यात आला होता. आझाद मैदानात महिनाभर आंदोलन चालले. ठाणे येथील औद्योगिक न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
– अमोल राणे, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार राष्ट्रवादी काँग्रेस (इंटक)







