50 दुर्मिळ प्राचीन मंकला कातळ कोरीव पटखेळ सापडले
| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील घोसाळगडाच्या पायथ्याशी इतिहासाला उजाळा देणारा अत्यंत महत्त्वाचा पुरावा वन्यजीव अभ्यासक रोशन म्हात्रे व सह्याद्रीत गडकिल्ले भटकंती करणारे सुजल पडवळ यांनी शोधून काढला आहे. येथील खडकात कोरलेल्या गोलाकार खळग्यांच्या पद्धतशीर मांडणीतून हा खेळ मंकला प्रकारातील प्राचीन कातळ पटखेळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कुतूहल म्हणून हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी अनेकजण आपली पाऊले गडाच्या दिशेने टाकत आहेत.
याठिकाणी तब्बल 50 मंकला पटखेळ सापडले असून, अजूनही सापडण्याची शक्यता आहे व त्या दृष्टीने संशोधन देखील सुरू आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एकाच ठिकाणी 50 मंकला पटखेळ कुठेच आढळून आले नसल्याचे म्हणणे काही अभ्यासकांचे आहे. रोशन म्हात्रे व सुजल पडवळ यांनी अंत्यत परिश्रमाने हा अमूल्य ठेवा उजेडात आणला आहे. विशेष म्हणजे सह्याद्री डोंगर रांगांत या खेळाचे पुरावे अत्यल्प असल्यामुळे घोसाळगड परिसरात आढळलेला हा पुरावा अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक महत्त्वाचा ठरतो. या शोधामुळे घोसाळगडाच्या परिसरात प्राचीन वसाहत आणि व्यापारी मार्गांचे संकेत मिळतात. ऐतिहासिकदृष्ट्या असे कातळ खेळ पाण्याजवळ, वस्ती किंवा रहदारीजवळ, सामूहिक जमावाच्या ठिकाणी, पुरातन व्यापारी मार्गांवर कोरले जातात. यावरून घोसाळगडाच्या प्राचीन वसाहत, व्यापार-वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग होता, अशी ठोस शक्यता समोर येते. याचा अर्थ या परिसरातून नियमित मानववस्ती, व्यापारी हालचाल, सामाजिक-सांस्कृतिक संवाद होत होता. यातून प्राचीन काळातील खेळ, सामाजिक जीवन व स्थानिक संस्कृती यांचे एकत्रित चित्र स्पष्ट होऊन त्यावर प्रकाश पडला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मंकला सापडणे ही कदाचित महाराष्ट्रातील पहिली नोंद असू शकते. या माध्यमातून येथील इतिहास, व्यापारी मार्ग कसा होता व्यापार कसा चालत होता, संस्कृती कशी होती यांसारख्या बाबी उजेडात येऊ शकतात.
जगातील जुना गणकाधारित खेळ
मंकला हा जगातील सर्वात प्राचीन रणनीती खेळांपैकी एक आहे. त्याचा उगम इ.स.पू. 600-200 च्या काळात आफ्रिकेत झाला. दगडात केलेल्या खड्ड्यांमध्ये बिया/दगड वापरून खेळ खेळला जात असे. आफ्रिकेतून हा खेळ मध्यपूर्वेत नंतर व्यापाऱ्यांमुळे भारतात (इ.स. 700-900) पोहोचला. भारतात तो अळीगुळी मणे, आदी नावांनी प्रसिद्ध झाला. महाराष्ट्रात हा खेळ दगडी ओट्यांवर आणि किल्ल्यांवर खेळला जात असे. त्यामुळे मंकला हा 1000 वर्षांपेक्षा जास्त काळ भारतात खेळला जात असून, मध्यपूर्व आणि दक्षिण आशियात आढळणारा रणनीतीवर आधारित बोर्ड गेम मानला जातो.
येथील स्थानिक रहिवासी असून या ठिकाणी भटकंती करत असताना अशा प्रकारे कातळावर कोरलेली ही नक्षी दिसली. मित्र सुजल पडवळ यास याबाबत सांगितले असता त्या ठिकाणी हे प्राचीन मंकला असल्याचे समजले. आणि मग दोघांनी मिळून तो परिसर पिंजून काढला व पन्नास पेक्षा अधिक मंकला सापडले. याद्वारे इतिहासाला आणखी उजाळा मिळाला आहे. येथे शिवलिंग सारखे एक कोरलेली आकृती देखील सापडली आहे. त्याबाबत संशोधन करायचे आहे.
-रोशन म्हात्रे,
वन्यजीव अभ्यासक, घोसाळे







