महिला बचत गटांना मिळाले उत्पन्नाचे स्त्रोत
| श्रीवर्धन | प्रतिनिधी ।
श्रीवर्धन येथे नोव्हेंबर, डिसेंबर महिना दरम्यान शैक्षणिक सहलींचे प्रमाण वाढले आहे. आलेल्या विद्यार्थ्यांची निवासाची सुविधा ही सामाजिक सभागृहमधून केली जात आहे. एक-दोन दिवसासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची चहा, नाश्ता व दोन्ही वेळेची भोजनाची ऑर्डर श्रीवर्धन येथील महिला बचत गटांना दिली जात आहे. यामुळे महिलांच्या हाताला काम मिळाले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी शैक्षणिक सहलींचे प्रमाण खूपच वाढले आहे. यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी श्रीवर्धनला भेट देत आहेत. 1 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत सुमारे 173 शैक्षणिक सहलींच्या बसेस श्रीवर्धन येथे दाखल झाल्या. शाळांच्या खोल्या,लॉज तसेच येथील विविध समाज सभागृहमधून विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या नाश्ता, भोजन व्यवस्था उत्तम व्हावी या दृष्टीने येथील समाज सभागृह व्यवस्थापकांनी कंत्राट महिला बचत गटांना दिले आहे.
श्रीवर्धन येथे अकरा महिला बचत गट कार्यरत आहेत. शैक्षणिक सहल व्यवस्थापक यांच्या कडून कोकणी प्रकारचे अल्पोपहार, शाकाहारी जेवणात कोकणातील विविध प्रकारच्या भाज्या सह सणासुदीच्या दिवसात केल्या जाणाऱ्या गोड पदार्थांची ऑर्डर महिला बचत गटांना देण्यात आली होती. शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून या निमित्ताने महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत प्राप्त होऊ लागले आहे.
शालेय सहलीच्या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था समाज सभागृहात केली जाते. साधारण शंभर ते सव्वाशे विद्यार्थ्यांच्या नाश्ता व जेवणाचे कंत्राट महिला बचत गटांना देण्यात येते. नाश्त्याला पोहे त्याचबरोबर जेवणात चपाती, डाळ भात व बिरड्याची उसळ या प्रमाणे उत्तम व्यवस्था करण्यात येते.
– महेश अनंत चोगले, व्यवस्थापक, माळी समाज सभागृह, श्रीवर्धन







