| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सकाळची वेळ होती, प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त होते. मात्र, अचानक आक्षी- साखरमधील एका चहाच्या दुकानात घुसून बिबट्याने कामगारावर हल्ला केला. या हल्ल्यात कामगार जखमी झाला. बिबट्याने हल्ला केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच भितीचे वातावरण निर्माण झाले. हल्ला करून बिबट्या तेथून पसार झाला. मात्र, दहशत कायम राहिली. त्यानंतर बिबट्या कुठे गायब झाला, हेच समजले नाही. कांदळवन परिसरात संपूर्ण जाळी लावण्यात आली.
कोलाड येथील वाईल्ड लाईफ रेस्क्यु टीमद्वारे ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आली. वन विभागाने हातात काठ्या जाळी घेऊन सर्च ऑपरेशन केले. परंतु, संध्याकाळ झाली, तरी बिबट्याचा सुगावा लागला नाही. त्यामुळे बिबट्याची दहशत कायमच असल्याचे दिसून आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून नागाव, आक्षी परिसरात बिबट्याने धुडगूस घातला असून अनेकांवर हल्ले केले आहेत.
मंगळवारी सकाळी नागावमधील वर्तक वाडीमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार स्थानिकांना दिसून आला होता. यामध्ये सुरुवातीला अमित वर्तक आणि प्रसाद सुतार यांच्यावर त्याने हल्ला केला होता. त्यानंतर मंदार गडकरी, कुणाल साळुंखे, भाऊसाहेब जावळे, अनिकेत पाटील यांच्यावरही हल्ला केला. यामध्ये वन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पकडण्यासाठी रचण्यात आलेल्या सापळ्यात बिबट्या सापडला नाही. अनेकवेळा चकवा देऊन तो तेथून गायब झाला.
गुरुवारी देखील नागाव परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी नागावमध्ये दाखल झाले होते. सर्च ऑपरेशन करूनही बिबट्या नागाव परिसरात सापडला नाही. बिबट्याच्या दहशतीखाली नागावकर असताना शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आक्षीमधील साखर येथील चहाच्या दुकानात घुसून बिबट्याने आनंदकुमार निषाद या कामगारावर हल्ला केला. त्यानंतर लोकेश नावाच्या एका केरळमधील कामगारावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले. बिबट्याचा संचार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच येथील स्थानिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिकांनी देखील पुढाकार घेतला. वन विभागाच्या सोबत राहून नागरिक मेहनत घेत होते. कांदळवन परिसरात जाळे लावण्यात आले. रेस्क्यू टीमच्या मदतीने ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने बिबट्याचा शोध करण्यात आला. कित्येक तास उलटूनही बिबट्याचा शोध लागला नाही. त्यामुळे वन विभागासह स्थानिक बिबट्याच्या शोधात लागल्याचे दिसून आले.
बिबट्यासाठी कोंबड्यांची मेजवानी
साखर परिसरात कांदळवन नजीक बिबट्याचा वावर असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या परिसरात सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. बिबट्याला पकडण्यासाठी आता पिंजऱ्याचा वापर करण्यात आला आहे. चार पिंजरे ठिकठिकाणी लावण्यात आले असून परिसरात जाळीदेखील लावण्यात आली आहे. त्यामुळे आता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोंबड्यांची मेजवानी ठेवण्यात आली आहे.
रिकाम्या पिंजऱ्यांना बिबट्याची प्रतीक्षा
नागावमध्ये बिबट्याने 6 जणांवर हल्ला केल्यानंतर वनविभागाने संपूर्ण टीमसह त्याला पकडण्याचे प्रयत्न केले. मात्र वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागावमध्ये बिबट्याने कर्मचाऱ्यांना गुगारा देत पलायन केले. शुक्रवारी बिबट्याने पुन्हा रुद्र रुप धारण करीत दोघांवर जीवघेणा हल्ला केला. मात्र पुन्हा एकदा वनविभागाला अपयश आले. वन विभागाने पिंजरे, थर्मल ड्रोन तसेच दिवसरात्र पाळत ठेवणारी विशेष पथके तैनात करून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरु केली. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांत बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले नाही.
तीन ते चार दिवसांपूर्वी नागावमध्ये बिबट्या आढळून आला होता. कदाचित तोच बिबट्या असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. हा बिबट्या या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन स्थलांतर करून पुढे जंगलात जाऊ शकतो. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. काम करताना गाणी लावण्यात यावी. लहान मुलांना संध्याकाळी बाहेर पाठवू नये, देऊ नका, असे आवाहन केले जात आहे. रिक्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि सह्याद्री वनजीव सामाजिक संस्था या दोन्ही टीम दाखल झाली असून बिबट्याचा वेगवेगळ्या मार्गाने शोध सुरू आहे. थर्मल ड्रोनद्वारे शोध घेण्यात आला आहे. वन विभाग, स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन व रिस्क्यू टीम यांच्या माध्यमातून शोध सुरू आहे. चार पिंजरे लावण्यात आले आहेत.
–सागर दहींबेकर
रिस्क्यू टीम
आक्षी येथील साखर परिसरात शुक्रवारी सकाळी बिबट्याने दोघांवर हल्ला केला आहे. त्यात ते जखमी झाले आहेत. एका कुत्र्याला देखील बिबट्याने मारले आहे. रोहा येथील रिस्क्यू टीम दाखल झाली आहे. स्थानिकांनीदेखील बिबट्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी जाळी लावली आहे. नागरिकांनी सतर्क राहवे. बाहेर पडू नये, स्वतःची काळजी घ्यावी.
-रश्मी पाटील
सरपंच







