। कोलाड । प्रतिनिधी ।
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोलाड नजीकच्या पुई गावाजवळ शनिवारी (दि.13) भीषण अपघात घडला. हा अपघात सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास झाला असून यात बाप–लेकाचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सज्जाद सरखोत (रा. वनीपुरार) हे काही काळ परदेशात कामानिमित्त वास्तव्यास होते. शनिवारी पहाटे ते मुंबई विमानतळावर आले होते. त्यांचा मुलगा अवैस सरखोत आणि दुसरा मुलगा त्यांना घरी आणण्यासाठी कारने विमानतळावर गेले होते. मुंबईहून माणगावकडे परतत असताना मुंबई–गोवा महामार्गावर पुई गावाजवळ कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पुढे असणाऱ्या वाहनावर जोरात आदळली. यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्यामुळे सर्वजण कारमध्ये अडकले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. या अपघातात सज्जाद सरखोत आणि त्यांचा मुलगा अवैस यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरा मुलगा सरजित सरखोत आणि हुसबान अब्दुल हमीद कारविनकर (रा. आंबेत ता. म्हसळा) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी कोलाड पोलीस अधिक तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







